Ahmenagar News : करोडो घेऊन पळालेले शेअर ट्रेडर्स गुंतवणूकदारांना पोलिसांत गेल्याने देतायेत धमकी, एकाने तर बंदूकीचाच विषय काढला…

Published on -

अहमदनगरमध्ये सध्या अनेक घोटाळे विशेषतः सहकार क्षेत्रातील घोटाळे उजेडात आले. त्यापाठोपाठ शेअरमार्केटमधील काही ट्रेडर्स करोडो रुपये घेऊन पळाल्याची घटना घडली. याने अहमदनगर जिल्हा हादरून गेला.

शेवगाव तालुक्यामधील काही शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यावसायिकांनी रातोरात पलायन केल्यानंतर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रारी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भूमिगत झालेले काही शेअर ट्रेडर्स व्हॉट्सअॅप ग्रुपवर खळबळजनक मेसेजेस पाठवून अप्रत्यक्षपणे गुंतवणूकदारांना धमकी देत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे.

शेवगाव तालुक्यातील चापडगाव, सोनविहीर, लाडजळगाव, गदेवाडी, आंतरवाली, सुकळी व इतर ठिकाणी शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यावसायिकांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये गोळा करून काही दिवसांपूर्वी गावातून पळ काढला.

लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने गुंतवणूकदारांनी फसवणुकीच्या व चेक बाउन्सच्या तक्रारीसाठी पोलिस ठाणे गाठले. त्यामुळे पलायन केलेले शेअर ट्रेडर्स धास्तावले असून, त्यांनी शनिवारी (दि. २०) गुंतवणूकदारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर खळबळजनक असे मेसेजेस पाठविले.

‘ज्यांनी मला मानसिक त्रास दिला व पाठीमागे नको ते कृत्य केली, त्या सर्वांचा हिशोब होईल. पैसे पाहिजे असतील तर पोलिसांत कम्प्लेंट करू नका, नाहीतर पैसे विसरा, पोलिसांत तक्रार केली तर पैसे कोर्टातून भेटतील,’ असे मेसेजेस एका शेअर ट्रेडर्सने पाठविले.

तर पलायन केलेल्या दुसऱ्या एका शेअर ट्रेडर्सने ‘मला सहा महिने त्रास देऊ नका. ज्यांचे माझ्याकडे पैसे आहेत, त्यांचे शंभर टक्के पैसे मिळतील. परंतु, विरोध केला तर मीही विरोधात उभा राहील, जैसी करणी वैसी भरणी,’ असे मेसेजेस पाठवून शेअर ट्रेडिंग करणारे एकप्रकारे गुंतवणूकदारांना तक्रारी करू नये, यासाठी अप्रत्यक्षपणे धमकावत असल्याचे दिसून येते.

डोक्याला पिस्तूल लावले अन…
बोधेगाव परिसरातून मला जास्त त्रास झाला. काहींनी ऑफिसला येऊन डोक्याला पिस्तूल लावले. चाकूचा धाक दाखवून धमक्या दिल्या. त्यामुळे कुटुंबाचा व माझा जीव वाचविण्यासाठी मला गाव सोडावे लागले, असे शेवगावच्या पूर्व भागातील एका पलायन केलेल्या शेअर ट्रेडिंग करणारा मेसेजेसमधून म्हणत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News