ज्ञान हीच शक्ती समजून लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळीचा आधार घेवून उभे केलेले काम सामाजिक, आर्थिक समता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरले. याच विचाराने ग्रामीण विकासाचा निर्देशांक २६ टक्कयांपर्यंत आपल्याला न्यावा लागेल. जलसंवर्धना बरोबरच तंत्रज्ञान, विज्ञान आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देवून देश विश्वगुरु बनेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबध्द केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास ना.राधाकृष्ण विखे पाटील, आ.शिवाजीराव कर्डीले, आ.मोनीका राजळे, आ.काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ.शिवाजीराव कर्डीले, आ.विक्रमसिंह पाचपुते, आ.अमोल खताळ, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, सौ.शालिनीताई विखे पाटील, सौ.सुवर्णा विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यातील विचार हा आपल्या सर्वांना प्रेरणादायी असल्याचे सांगून या देशामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरु करण्यासाठी अर्थ राज्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या सहकार्याची आठवण सांगून, त्यांच्याकडे ग्रामीण विकासाचा एक दृष्टीकोन होता. ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवायचे असेल तर, विकासाला प्राधान्य द्यावे लागले, यावरच त्यांची निष्ठा होती. याकडे लक्ष वेधून गडकरी म्हणाले की, शेती विकासाची कोणतीही व्यवस्था किंवा साधनं नसल्यामुळे विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरला. पण ही परिस्थिती आता बदलत आहे. जल संवर्धनाला प्राधान्य दिल्यामुळेच या भागातील शेतकरी आता उर्जादाता बनत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील रस्ते विकासाला प्राधान्य देताना ग्रामीण भागही शहरांना जोडण्याचा प्रयत्न करीत असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व रस्ते प्राधान्याने पुर्ण करण्यासाठी काम सुरु आहे. नांदुर शिंगोटे, सिन्नर या रस्त्यांबरोबरच सुरत-चैन्नई आणि अन्य रस्ते पुर्ण करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च येणार नाही असे सांगून या रस्त्यांची कामे करतानाच जिल्ह्यातील जल संवर्धनाच्या कामालाही आमचा विभाग मदत करेल. नाले आणि तलाव निर्माण करुन,या जिल्ह्यातील सिंचन वाढले तर, जिल्ह्याची परिस्थिती अधिक बदलेल असा विश्वास व्यक्त करुन, ग्रामीण विकासाचा निर्देशांक १२ टक्क्यांवरुन आपल्याला २६ टक्क्यांवर न्यावा लागेल.यासाठी शिक्षणालाही प्राधान्य द्यावे लागेल. ज्ञानार्जन व्हावे म्हणून प्रयत्न करताना तंत्रज्ञान, विज्ञान आणि कौशल्य विकास यावरच लक्ष केंद्रीत करावे लागेल.
देशातील शेती व्यवस्थेत अमुलाग्र बदलांचे दाखले देवून गडकरी म्हणाले की, रासायनीक खतांमुळे जमीनी आता खराब होत आहेत. सेंद्रीय शेतीला प्राधान्य द्यावे लागेल. सौर उर्जेशिवाय पर्याय नाही. विदर्भामध्ये याला आम्ही प्राधान्य दिले असून, नव्या वाणांच्या गायींमुळे दूग्ध व्यवसायाकडे शेतकरी आता वळत आहेत.
लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील आपल्या गुणात्मक कार्यातून वेगळे स्थान निर्माण केले. या पाठीमागे त्यांचा त्याग होता, लोकांशी बांधिलकी होती. यामुळेच अशा व्यक्तिंना यश मिळते. या भागात सहकारातून शैक्षणिक प्रकल्प उभारुन त्यांनी नवा मार्ग दिला. यातूनच ग्रामीण भागाचा सुखांक वाढविण्याचा प्रयत्नही झाल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या आत्मचरित्रात हाच विचार आपल्याला पाहायला मिळतो. यातून त्यांनी स्वतंत्र मतं मांडली, त्याचा विचार बनला. आपल्याकडे मात्र विचार शुन्यता हीच देशाची मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषणात या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यास गडकरी साहेबांनी यावे ही इच्छा होती. कारण खासदार साहेब आणि त्यांचा स्नेह राजकारणा पलिकडचा होता. खासदार साहेबांचे आत्मचरित्र म्हणजे पन्नास वर्षांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीतील एक ऐतिहासिक दस्ताएैवज असल्याचे सांगून, खासदार साहेबांच्या नावाने आता देशपातळीवर सहकार, कृषी, शिक्षण आणि जलसंवर्धनात उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्तिंना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या समितीचे अध्यक्षपदही ना.गडकरी साहेबांनी स्विकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ.सुजय विखे पाटील यांचीही भाषण झाली. कार्यक्रमास राज्यासह जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते.