२२ जानेवारी २०२५ अकोले : तालुक्यातील अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यांतील १५ गावांना सिंचन उपलब्ध करणाऱ्या आढळा धरणावरील कालव्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सदस्य आणि माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे.
आढळा धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे ३,९१४ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होते. या दोन्ही कालव्यांची लांबी २० किमी पेक्षा जास्त आहे.महाराष्ट्र सरकारने या कालव्यांच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च केले आहेत ; मात्र काही अधिकारी आणि काही ठेकेदारांच्या संगनमताने दाखविलेली कामे प्रत्यक्षात झालेली नाहीत.जी कामे करण्यात आली ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत,असे वाकचौरे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले.
वास्तविक,कालव्यांची दुरुस्ती न करता ती केवळ कागदावरच दाखवली गेली आहे.हे सर्व काम झाले नाही,तरी त्यासाठी पैसे घेतले गेले आहेत.वरिष्ठ अधिकारी याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत,ज्यामुळे भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू असताना, कालव्यात योग्य दुरुस्ती झाली असती तर शेतकऱ्यांना योग्य पाणी मिळाले असते आणि त्यांचे पाणी मागणी अर्ज वेगाने पूर्ण झाले असते. तथापि, कालव्यांची योग्य दुरुस्ती न झाल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही,
याची शाश्वती मिळाल्याने त्यांचा पाणी मागणी अर्जावर मोठा परिणाम होईल,असे वाकचौरे यांनी सांगितले.मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांकडे तक्रार दाखल केली असून लवकरच माहिती अधिकार अंतर्गत ही माहिती गोळा करून शेतकऱ्यांसमोर मांडली जाईल,असे त्यांनी सांगितले.