बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण ! शेतीकामासाठी शेतमजुर मिळेना…

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar News : राहाता तालुक्यासह गणेश परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्‍यात बिबट्याचे मनुष्यावर वाढत चाललेले हल्ले बघता विशेषता रात्रीच्या वेळी परिसरातील शेतकरी वर्गाला विजपंप चालू करण्यास जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने रात्रीच्या वेळी केला जाणारा श्री-फेज विजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी माजी संचालक देवेंद्र भवर यांनी केली आहे.

तालुक्यासह गणेश परिसरात सद्या अनेक नागरिकांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत आहेत. बिबट्याच्या दहशतीने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. त्यात लोणी परिसरात मनुष्यावर प्राणघातक हल्ले करत बिबट्याने दोन लहान बालकाचे जीव घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे गणेश परिसरात शेतीकामासाठी शेतमजुर मिळेनासे झाले आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल जाणवत लागल्याने शेतातील उभ्यापिकांना जगविण्यासाठी शेतकरी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहेत.

परिसरात पावसाचे झालेले प्रमाण कमी, यामुळे जेमतेम पाण्यात पिकं वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र दिसत आहे. विहीर, बोअरवेल, अशा पाण्याच्या स्त्रोतातून शेतातील गहु, हरभरा, पशुधनासाठी लागणारा चारापिके, ऊस, फळबाग या पिकाना पाणी व्यवस्थापन करताना

शेतकरी वर्गाला आपला जीव धोक्यात घालून पिकाना पाणी देण्याची वेळ आली आहे. त्यात महावितरण कंपनी दर महिन्यात वेळात बदल करत एक आठवडा दिवसा श्री-फेज विजपुरवठा व एक आठवडा रात्री शेतातील विज पंपासाठी विजपुरवठा पुरवित आहेत.

रात्रीचा विज पुरवठा हा शेतकरी वर्गाच्या दृष्टीने अडचणीचा ठरु पाहात आहेत, कारण तालुक्यासह परिसरात बिबट्याचे वाढलेले प्रस्थान व वाढत चाललेले प्राणघातक हल्ले बघता रात्रीच्या वेळी शेतातील विजपंप चालु करण्यासाठी करावा लागणारा प्रवास हा जीवमुठीत धरुनच करावा लागत.

गणेश परिसरासह एकरुखे गावाच्या पंचक्रोशीतील शेतकरी वर्गाचे महावितरण वीज नियोजनामुळे शेतीच संतुलन बिघडत आहे. त्यामुळे शेतीचे आर्थिक नुकसान देखील होत आहेच त्यात आणखी बिबट्याच्या भीतीने देखील शेतकरी चिंताग्रस्त असून महावितरणने विजेचे भारनियमन कमी करून पूर्णवेळ वीज सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe