अण्णा म्हणाले…ग्रामपंचायत सरपंचाचा लिलाव होणे, हा लोकतंत्राचा लिलाव

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. यातच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी लाखोंच्या कोटींच्या बोळ्या लागल्या जात आहे. याप्रकरणावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत काही गावांत सरपंचाच्या पदाचा लिलाव करून बोली लावल्याची बातमी वाचली. वास्तविक पाहता हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच पदाचा लिलाव झाला, तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठविले असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभीचारी लोक त्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामसभेमध्ये गावच्या सर्व मतदारांच्या संमतीने अविरोध निवडणूक करून निवडणूक करणे, हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गावात मतभेद होत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडतात, आणि पाच वर्षे खेळीमेळीच्या वातावरणात गावाचा विकास होत राहतो.