संतापजनक : मुलीच्या छेडछाडीला विरोध करणार्या माजी सभापतीच्या कुटुंबाला मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अल्पवयीन मुलीची छेडछाड करताना रोखल्यामूळे आरोपी तरुणांनी चिडून श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी सभापती शहाजी हिरवे यांच्या घरावर हल्ला चढवला व त्यांच्या पत्नीसह इतर महिलांना मारहाण करून घरातील रोख रकमेसह गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले असल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली.

याबाबत मनीषा शहाजी हिरवे यांच्या फिर्यादीवरून १२ जणांवर विनयभंग, मारहाण व रोख रकमेसह सोने लुटीचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या घराजवळ एक गरीब कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. त्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला गुंड प्रवृत्तीचे तरुण छेडछाड करून त्रास देत होते.

यामुळे फिर्यादीच्या मुलाने व इतर मुलांनी या तरुणांना समज देण्याचा प्रयत्न दोन दिवसांपूर्वी केला होता. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली होती. फिर्यादीत मनीषा हिरवे यांनी म्हटले आहे की, या घटनेचा राग येऊन विजय पांडुरंग कुसाळकर, पांडुरंग बाळू कुसाळकर, रोहित जालिंदर कुसाळकर, विलास भोजू कुसाळकर, जालिंदर सखाराम कुसाळकर, रवी लालासाहेब कुसाळकर, नितीन बाबासाहेब कुसाळकर, योगेश बाबासाहेब कुसाळकर, मुका (नाव माहीत नाही), बाबासाहेब कुसाळकर, भरत कुसाळकर, यातील काही आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती समजली आहे.

आणि काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सदस्यास उचलून नेऊन जबर मारहाण केल्याचीही घटना घडली आहे. सदर आरोपी यांनी गावावर संघटित दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरज कुसाळकर (सर्व रा. वडारवस्ती, पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) आणि पप्पू लष्करे (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) हे आमच्या घरी अचानक मोटारसायकलवरून आले व तुमचा मुलगा अनिकेत कोठे आहे असे त्यांनी विचारले असता, घरी कोणीच नाही असे सांगितल्याचा राग येऊन त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत दमदाटी करू लागले.

त्यातील विजय पांडुरंग कुसाळकर व इतर दोन जण आमच्या घरात शिरून मुलगा अनिकेत आहे का ? पाहू लागले. त्याचवेळी मी त्यांना घरात शिरण्यास प्रतिबंध केला असता त्यांनी मला धक्काबुक्की केली. विजय पांडुरंग कुसाळकर याने माझ्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे रुपये ७० हजार रुपयांचे गंठन तोडून नेले व कपाटात ठेवलेले पन्नास हजार रुपये काढून नेले आहेत. तसेच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आहे.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींनी आमच्या वस्तीवरून पारगाव गावात येत असताना गणपती मळा येथील आजारी असलेले वयोवृद्ध किसन अर्जुन हिरवे यांच्या घरी जाऊन तुमचा नातू प्रमोद कुठे गेला? असे विचारून त्यांना मारहाण सुरु केली व आमच्या नादी लागले तर एकएकाला जीवे मारण्याची धमकी दिली व ते सर्वजण मोटारसायकलवरून गावातून जोरात हॉर्न वाजवत व मोठयाने ओरडत दहशत निर्माण करून गेले आहेत. असे फिर्यादीत नमूद केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment