Ahmednagar News : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावाणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात तब्बल ७ लक्ष महिलांचे अर्ज भरून घेण्यात यश प्राप्त झाले आहे. आता प्राप्त झालेल्या महिलांच्या या अर्जाची छाननी जलदगतीने व्हावी, यादृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र छाननी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

याठिकाणी दोन-तीन शिफ्टमध्ये कर्मचारी दाखल अर्जाच्या छाननीचे काम युद्धपातळीवर करत आहेत. येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण करण्याचा जंग बांधण्यात आला आहे.
जिल्ह्यात १ ऑगस्टपर्यंत सात महिला लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली.
तसेच या मोहिमेचा दैनंदिन आढावा,तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुनियोजन कामामुळे ७ लक्ष महिलांचे अर्ज भरून घेण्यात यश प्राप्त झाले आहे.
या योजनेंतर्गत आजपर्यंत ४३ हजार ७११ पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे येरेकर यांनी आवाहन केले आहे.
तसेच योजनेशी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले असल्याचे कळविण्यात आले आहे.