Ahilyanagar News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा कालच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आली व त्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे व या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली असून लवकरात लवकर मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्याकडे आता प्रत्येक पक्षाचा कल दिसून येईल. विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन देखील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये अजून पर्यंत विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे निश्चित न केल्या गेल्यामुळे इच्छुकांमध्ये आणि विद्यमान आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
नेमके तिकीट कुणाला मिळेल? याचे उत्तर मिळत नसल्यामुळे सगळ्यांमध्ये एकंदरीत गोंधळाचे वातावरण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच पद्धतीची स्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, अहिल्यानगर शहर तसेच शेवगाव पाथर्डी आणि श्रीगोंदा व अकोले विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून प्रचंड प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. परंतु अजून देखील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित करण्यात आलेले नसल्याने काही जागांबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे.
यामध्ये जर आपण बघितले तर प्रामुख्याने वैभव पिचड, विवेक कोल्हे, संदीप कोतकर तसेच चंद्रशेखर घुले व अनुराधा नागवडे या नेत्यांच्या नेमक्या आता राजकीय भूमिका काय राहणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम
जिल्ह्यातील कोपरगाव, अहमदनगर शहर, शेवगाव- पाथर्डी आणि श्रीगोंदा, अकोले विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत विवेक कोल्हे, संदीप कोतकर, वैभव पिचड, चंद्रशेखर घुले आणि अनुराधा नागवडे यांच्या काय भूमिका राहणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाली आहे.
मतदानाची तारीखही निश्चित झाली आहे. मात्र महायुती व महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील उमेदवार ठरले नाहीत. जिल्ह्यातील काही जागांबाबत अजूनही संभ्रम आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे इच्छुक आहेत. परंतु, महायुतीत कोपरगावची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असल्याने कोल्हे यांची अडचण झाली आहे.
ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असतील, असेही जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.
याबाबत कोल्हे यांनी अजून तरी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यात ते मशाल हाती घेणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कोल्हे यांची भूमिका काय राहील, याची उत्सुकता आहे.अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर संदीप कोतकर इच्छुक आहेत.
त्यांचा लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. पण, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्याला दुजोरा मिळालेला नाही. कोतकर तुतारी हाती घेतात की अपक्ष लढतात, हे कोडे अजून तरी उलगडलेले नाही. अकोल्यातून माजी आमदार वैभव पिचड हे इच्छुक आहेत.
ते सध्या भाजपात आहेत. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असल्याने त्यांचीही अडचण झाली आहे. उमेदवारीसाठी पिचड पिता-पुत्रांनी गत महिन्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अकोल्यातून अमित भांगरे हेही तयारी करत आहेत. शेवगाव- पाथर्डीतून माजी आमदार चंद्रशेखर घुले मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी ते अजित पवार गटात दाखल झाले होते. पण विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून ते अजित पवार गटापासून सुरुवातीपासूनच अंतर ठेवून होते.
महायुतीत ही जागा भाजपाला सुटणार असल्याने घुले अपक्ष लढतात की चिन्हावर, याची उत्सुकता आहे. श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवारीसाठी कमालीची चुरस आहे.
श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे इच्छुक आहेत. त्या सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत.महायुतीतील सिटिंग- गेटिंग फॉर्म्युल्यानुसार ही जागा भाजपला सुटेल, असे दिसते.
यामुळे नागवडे यांचीही अडचण झाली आहे. त्यांचे पती राजेंद्र नागवडे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप हे मैदानात उतरले असल्याने नागवडे यांची भूमिका काय राहील, याबाबत उत्सुकता आहे.