नगर अर्बन घोटाळ्याप्रकरणी तपासणीला वेग आला असून याबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहे. दरम्यान आता या घोटाळ्याचा फॉरेन्सिक रिपोर्टही आलेला असून फॉरेन्सिक ऑडीट नुसार अर्बन बँक घोटाळ्यातील संशयित आरोपींची संख्या १०५ झाली आहे. फॉरेन्सिक ऑडीट करणाऱ्या कंपनीकडून अद्ययावत अहवाल मागितला आहे. आरोपींची संख्या वाढणार आहे.
ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल झाल्याने सुमारे ५८ संशयित आरोपींच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. तसेच त्याबाबत कार्यवाही सुरू झाल्याचे देखील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी म्हटले आहे.

१७५ कोटी रुपयांची गरज, ४ कोटी २५ लाखांची वसुली
बँकेला ठेवीदारांच्या देणी द्यायच्या असतील तर १७५ कोटी रुपयांची गरज असल्याचे समजते. सध्या बँकेने कर्जदारांकडून वसूली करण्याचा प्रयत्न सुरु केलाय. आतापर्यंत ४ कोटी २५ लाख वसूल केली आहे. बँकेकडे सध्या ४० कोटी शिल्लक आहेत. सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
बँकिंग व्यवहाराचा परवाना रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबर २०२३ रोजी रद्द केला असून त्या दिवसापर्यंत खातेदारांच्या खात्यावरील मुद्दलीची रक्कम त्यांना परत करण्यात येणार असल्याचे बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी सांगितले आहे. दरम्यान राजेंद्र गांधी यांनी ठेवीदारांना त्यांच्या ५ लाखाच्या पुढील ठेवी परत मिळण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केली.
कर्जदारांवरही कारवाई करण्याचा विचार
अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत ५ कोटी ३० लाखाचा बनावट सोनेतारण घोटाळा झाला असून यासंदर्भात गुन्हा दाखल आहे. मात्र तेथील गोल्ड व्हॅल्युअर वगळता कोणत्याच कर्जदारावर कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर कारवाई केल्यास त्यातून कोट्यावधी रूपये वसूल होतील, याकडे राजेंद्र गांधी यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असे अवसायक गायकवाड व उपअधीक्षक मिटके यांनी सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे.