आरोपींची मुजोरी, दहशत अहमदनगर जिल्ह्यात किती वाढली आहे याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना घडली. आरोपीकडूनच पोलिसांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पकडण्यासाठी गेलेल्या आरोपीकडूनच हा प्रयत्न झाला. सागर रमेश कर्डिले असे या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक तुकाराम भीमराव खेडकर (वय ३५) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी : नेवासा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जीवे ठार मारण्याच्या (कलम ३०७) गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. या पोलिसांच्या गाडीला डंपरने धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी गेवराई येथील सागर रमेश कर्डिले या आरोपीविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समजली आहे.
पोलीस नाईक तुकाराम भीमराव खेडकर (वय ३५) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, २७ जानेवारी रोजी पावणे दोन च्या सुमारास त्यांच्या वस्तीजवळ, गेवराई ता. नेवासा येथे नेवासा पोस्टे गु.र.नं. १२६७/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी सागर रमेश कर्डिले, रा. गेवराई, ता. नेवासा यास आम्ही पकडण्यास गेवराई शिवारात गेलो होतो.
तेथे त्याने आम्हाला पोलीस गणवेशात असलेले पाहून आमच्यावर दगडफेक केली. आम्ही स्कॉर्पिओ (एमएच १२ जेसी ८४११) मध्ये बसून त्यास अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने डम्परने आमच्या स्कॉर्पिओ गाडीच्या डाव्या बाजूने जोराची धडक दिली. त्याने आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करुन आमच्याकडील स्कार्पिओ गाडी (एमएच १२ जेसी ८४११) हिचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.