Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सराफ बाजार भागातील संतोष वर्मा यांच्या मालकीच्या वर्मा ज्वेलर्स या दुकानात रविवारी (दि. १) पहाटे चोरीचा घटना घडली असून २५ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
इतकेच नाहीतर चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआरही चोरुन नेल्याने पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे सराफ बाजारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदनगर शहरातील भरवस्तीत चोरीची घटना घडल्याने व्यापारी हादरून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरुन आरोपींच्या हाताचे ठसे घेतले आहेत.
तपासासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. याप्रकरणी वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३० सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे दुकानातील सोने व रोख रक्कम कॅश काऊंटरच्या ड्रॉव्हरमध्ये व्यवस्थित लॉक करून रात्री सव्वा नऊ वाजता दुकान बंद केले.
रविवारी (दि.१) पहाटे सव्वापाच वा. च्या सुमारास कोतवाली पोलिसांचा फोन आला की, तुमचे दुकान अज्ञात चोरट्याने फोडले आहे, तुम्ही लवकर दुकानात या. तेव्हा मी व माझा मुलगा सुमित आम्ही दोघे साडेपाच वाजता दुकानात आलो.
यावेळी दुकानातील कॅश टेबलच्या ड्रॉव्हरच्या लॉक कशाने तरी तोडून त्यामधील २ लाख १० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन चेन, १२ लाख रुपये किंमतीची सोन्याचे चेन व ब्रासलेट, ८ लाख २० हजार रुपये किंमतीचे लेडिज नेकलेस,
सोन्याचे अंगठ्या, सोन्याचे टॉप्स, सोन्याचे पेन्डल तसेच २८ हजाराची रोकड असा २४ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच दुकानातील सिसिटीव्ही फुटेज व डीव्हीआरही चोरट्यांनी चोरुन नेले आहे.