Ahmednagar News : रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी पुन्हा अर्ज केला होता. आता याबाबत मोठी अपडेट आली आहे. बोटे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे.
ऑगस्टअखेर कामकाज पूर्ण करा. या मुदतीत खटला पूर्ण न झाल्यास आरोपीला पुन्हा जामीन अर्ज दाखल करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले.
बोठे याने जामिनासाठी खंडपीठात धाव घेतली होती. सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात सरकारी वकील उपस्थित राहत नाहीत. खटल्यास विलंब होत आहे. त्यामुळे यात आरोपीचा दोष नसून त्याला जामीन मिळावा अशी बोठे याने मागणी केली होती.
फिर्यादी जरे यांच्या वतीने अॅड. एन.बी. नरवडे यांनी जामिनास हरकत घेतली. आरोपीने यापूर्वी अगोदरच उच्च न्यायालयात खटला दुसरीकडे वर्ग करण्याबाबत अर्ज केला होता. एकीकडे असा अर्ज केला जातो. दुसरीकडे सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालत नाही,
असाही दावा आरोपी करतात. हा विरोधाभास आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती एस. ए. देशमुख यांनी जामीन अर्ज फेटाळला.
जरे यांचा तीन वर्षांपूर्वी नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात खून झाला होता. या गुन्ह्यात बोठे आरोपी असून तो सध्या कोठडीत आहे. या खटल्याची सुनावणी सध्या येथील जिल्हा न्यायालयात सुरू आहे.
आतापर्यंत फिर्यादी असलेल्या प्रत्यक्ष साक्षीदार व इन्क्केस्ट पंचनाम्यातील अन्य एका साक्षीदाराची साक्ष न्यायालयासमोर नोंदवली गेली आहे. बोठे याने जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायमुर्ती देशमुख यांच्यासमोर त्यावर सुनावणी झाली असून त्यांनी बोठेचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
सरकारी वकील अॅड. यादव यांनी खटल्याचे कामकाज सोडले
रेखा जरे खून खटल्यात सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उमेशचंद्र यादव कामकाज पाहत होते. इतर खटल्यांतील व्यस्ततेमुळे या खटल्याचे कामकाज पाहणे शक्य होत नसल्याचे कारण देत त्यांनी या खटल्याचे कामकाज सोडले आहे.