निळवंडे कालव्यांची कामे होऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. ज्यांनी निळवंडेच्या कामात काडीचीही मदत केली नाही. उलट सातत्याने काड्या घालण्याचे काम केले. निळवंडेचे पाणी आणण्यासाठी कोणी कष्ट घेतले आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
सर्वसामान्यांच्या समाधानाकरता राजकारण करायचे असते. मात्र, ते सुडाचे राजकारण करीत आहेत, हे चांगले नाही. याचा जनता नक्की जाब विचारेल, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथे आयोजित निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या जलपूजन कार्यक्रमात आमदार थोरात बोलत होते.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, निळवंडे पाट पाणी कृती समितीचे ज्येष्ठ नेते उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, विठ्ठल पानसरे, लक्ष्मणराव जोंधळे, साहेबराव जोंधळे, सरपंच आशाताई जोंधळे,
दूध संघाच्या संचालिका प्रतिभा जोंधळे, सोमनाथ जोंधळे, उपसरपंच अरुण जोंधळे, सुखदेव जोंधळे, कारभारी साबळे, तानाजी जोंधळे, अनिल भुसाळ, माऊली डेंगळे, आदींसह महिला, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले, दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव येथे पाणी परिषद घेऊन निळवंडे धरणासाठी प्रयत्न केले.
विविध मंजूरी नंतर या कामाला सुरुवात झाली. मात्र १९९९ नंतर कामाला खरी गती दिली. परिश्रम घेत धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. कोरोना संकटातही कामे सुरू ठेवली. पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला.
संगमनेर व अकोले तालुक्यातील जमिनी त्या शेतकऱ्यांना दिल्या. अनेकांना संगमनेरच्या सहकारी संस्थांमध्ये नोकरी दिल्या. त्यामुळे दुष्काळी भागात अनेक गावांना आता पाणी मिळाले आहे.
मात्र वरचा-खालचा करू नका. आगामी काळात निळवंडेचे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी प्रस्ताव तयार केला असून कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही.