Ahmednagar News : छगन भुजबळ हे केवळ सुपारी घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी कुणाकडून सुपारी घेतली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असून त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे.
त्यामुळे भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नयेत. त्यांचेच नेते असलेले अजित पवार यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे मग असे नेते भुजबळ यांना कसे चालतात,

यावरून भुजबळ यांचा केवळ गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणालाच विरोध असल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा बांधवांनी म्हटले आहे.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा बांधवांकडून छगन भुजबळ यांच्या नगरच्या सभेतील आरोपांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्यात आले.
यावेळी अॅड. गजेंद्र दांगट, गोरख दळवी, राम जरांगे, गिरीश भांबरे, स्वप्निल दगडे, मिलिंद जपे, परमेश्वर पाटील, किशोर शिंदे, शशिकांत भांबरे, अभय शेंडगे, किरण दंडवते, दत्तात्रेय वाबळे, महेश घावटे आदी उपस्थित होते. यावेळी दुपट्टी भूमिका घेणारे ओबीसी नेते,
मराठा आमदार, नगर मधील एल्गार सभेत बोलायला तयार नसलेले स्थानिक नेते, नगरसेवकांनी फिरवलेली पाठ आदी त्यांनी सडकून टीका केली तर काहीचा नावानिशी उल्लेख केला.
नगर येथील ओबीसी यलगार सभेत भुजबळ यांनी काही प्रमाणपत्रे भर सभेत दाखवली होती, त्यावर देखील मराठा क्रांती मोर्चा कडून उत्तर देण्यात आलेले असून,
स्वतः सत्तेत राहून जर असे गैरप्रकार झालेले आहेत तर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. केवळ सभेमध्ये स्वतःच बनवलेली खोटी प्रमाणपत्रे दाखवत आपल्या समाज बांधवांची देखील दिशाभूल करू नये.
संबंधित खोटी कागदपत्रे जर अधिकाऱ्यांनी बनवले असतील तर तुम्ही सत्तेत आहात सदर अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कुणाची वाट पाहात आहात? असे देखील आव्हान मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळ यांना देण्यात आलेले आहे.
दरम्यान भुजबळ यांनी राजीनाम्याबद्दलचे केलेले वक्तव्य देखील संभ्रम निर्माण करणारे असून, वास्तविक त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे द्यायला पाहिजे होता. मात्र अद्याप देखील ते त्याबद्दल सविस्तर बोलायला तयार नाहीत तर दुसरीकडे सरकारी गाडी,
सरकारी सुविधा आणि मंत्र्यासाठी सगळ्या असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा ते लाभ घेत आहेत. स्वतःच्या एकाही संस्थेला महापुरुषांचे नाव देण्यात आले नाही मात्र स्वतःचे नाव देण्यात आलेले आहे. यावर देखील मराठा क्रांती मोर्चा कडून लक्ष वेधण्यात आलेले आहे.
नाभिक बांधवांचा आम्हाला पाठिंबा असून भुजबळ यांनी नगर इथे येऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा देखील सल्ला मराठा क्रांती मोर्चा कडून त्यांना देण्यात आलेला आहे.