Ahmednagar News : जागतिक दर्जाचे तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी येथे जाण्यासाठी तसेच प्रमुख महामार्ग असलेल्या मात्र मोठ्या प्रमाणात खराब झालेल्या नगर-मनमाड महामर्गाच्या दुरुस्तीचे काम अखेर हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या काम सुरु असल्याने काम वेगाने करता यावे यासाठी विळद बाह्यवळण ते पुणतांबा फाटा या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक रविवार (१ सप्टेंबर) सकाळी ८ ते रविवार (८ सप्टेंबर) रात्री ८ वाजेपर्यंत इतर मार्गावरून वळवण्यात येणार आहे.
नगर-मनमाड महामार्गावर अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे दुरुस्तीच्या कामामध्ये व्यत्यय येतो आहे. यामुळे वाहतूककोंडी होऊन दुरुस्तीच्या कामास विलंब होत आहे.
सध्या पावसाळा सुरू असून, दुरुस्ती केलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने लगेच जात असल्यामुळे पुन्हा रस्ता खराब होत आहे. तसेच या मार्गावर शिर्डी साईबाबा मंदिर असल्याने भाविकांची वर्दळ असते. दुरुस्तीच्या कामादरम्यान अवजड वाहनांमुळे अपघात होऊ नये, यासाठी अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहे.
असा करण्यात आला आहे बदल :
– नगर, पुणे, सोलापूरकडून मनमाडकडे जाण्यासाठी मार्ग
– कल्याण बाह्यवळण चौक- नगर-कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिक.
– विळद घाट-दूध डेअरी चौक- शेंडी बाह्यवळण-नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून कायगाव-गंगापूर-वैजापूर-येवला मार्गे इच्छित स्थळी.
– शनिशिंगणापूर/सोनई रस्त्यावरून मनमाड (राहुरीकडे) येणारी अवजड वाहतूक नगर- छत्रपती संभाजीनगर मार्गावरून इच्छित स्थळी
– मनमाड-येवला-शिर्डीकडून नगर मार्गे पुणे/मुंबई/कल्याणकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुणतांबा फाटा-झगडे फाटा-सिन्नर-नांदूर शिंगोटे- संगमनेर-आळेफाटा मार्गे नगर
– मनमाड-येवलाकडून नगर/सोलापूर/बीडकडे येणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी पुणतांबा फाटा येथून वैजापूर-गंगापूर- कायगाव-प्रवरा संगम- शेंडी बाह्यवळण-विळद घाट-केडगाव बाह्यवळण मार्गे
– लोणी / बाभळेश्वर / श्रीरामपूरकडून नगरकडे बाभळेश्वर-श्रीरामपूर- टाकळीभान- नेवासा मार्गे नगर