Ahmednagar News : नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. सध्या अनेकांची धरपकड सुरु आहे. यामध्ये आता आरोपी असणाऱ्या माजी संचालकांचाही समावेश आहे.
तीन माजी संचालक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता नगर अर्बनच्या आरोपी संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यातून येणाऱ्या पैशांतून ठेवी परत करण्यात येतील असेही समजत आहे.

आरोपी असलेल्या माजी संचालकांच्या मालमत्तांबाबतची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे. तसे पत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आले आहे. नगर अर्बन गैरव्यवहारप्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटारियासह दोन माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे.
त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. यात शंभरहून अधिक आरोपींचा समावेश आहे. बँकेचे तत्कालीन अधिकारी व संचालकांनी संगनमताने २९१ कोटींचा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र, अनेक जण फरार झाले असल्याचे समजते.
मालमत्तांची मागितली माहिती
अनेक ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी या बँकेत अडकल्या आहेत. पोलिसांना जो फॉरेन्सिक ऑडिटचा अहवाल प्राप्त झालाय त्यावरून यातील सहभागी असणारे आरोपी समोर आले आहेत. आधारे पोलिसांनी आरोपींच्या मालमत्तेबाबतची माहिती मागविली आहे.
मालमत्ता खरेदी-विक्रीची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद असते. आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपींची नावे कळविण्यात आली असून, त्यांच्या मालमत्तांची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून जिल्हा प्रशासनाला दिली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून या मालमत्तांची किंमत निश्चित केली जाणार असून, या मालमत्तांचा लिलाव करून ठेवी परत केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
चौकशी सुरु
माजी अध्यक्षासह दोन संचालक सध्या अटकेत असून त्यांना एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कारागृहात ठेवले जाते. नगर अर्बन बँकेचा गुन्हा आर्थिक स्वरूपाचा असल्याने आरोपींना चौकशीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले जाते. दिवसभर त्यांची चौकशी सुरु असते अशी माहिती मिळाली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही दिल्या होत्या कारवाईच्या सूचना
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना दिला होत्या. ठेवीदारांचे एक शिष्टमंडळ ज्यावेळी त्यांना भेटायला गेले होते त्यावेळी त्यांनी या कारवाईच्या सूचना दिलेल्या होत्या.