Ahmednagar News : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअर कॉलेज पर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या महामार्गावर बसविलेल्या पथदिव्याचे उद्घाटन नुकतेच हस्ते झाले. मात्र, अद्याप या महामार्गावरील पथदिवे चालू न केल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी संगमनेर बस स्थानक जवळ काल मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले.
केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्याचे काम पूर्ण झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पथदिव्याचे उद्घाटन केले.

यावेळी वृषाली नाईकवाडी, आदीती नरवडे, आकांक्षा वर्पे, समिक्षा खैरनार या महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या हस्ते पथदिव्याच्या रोहीत्राचे पूजन करण्यात आले. तिरंगी फुगे आणि फटाक्यांची अतिषबाजी करून या कामासाठी केंद्र सरकारने केलेल्या भरघोस सहकार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून हे काम पूर्ण झाले आहे, असे सांगितले. स्थानिक नेते मात्र जाणीवपूर्वक या कामाचे श्रेय लाटण्याचे काम करीत आहे, अशी टीका गणपुले यांनी केली.
अनेक वर्षे सता असूनही ज्यांना या महामार्गाचे काम करता आले नाही ते या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका अमोल खताळ यांनी केली.
याप्रसंगी ज्ञानेश्वर करपे, जावेद जहागिरदार सतिष कानवडे, डॉ. सोमनाथ कानवडे, राहूल भोईर, शैलैश फटागरे, हरीषचंद्र चकोर, दिपक भगत, बापूसाहेब देशमुख, नेताजी घुले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या महामार्गावरील पथदिव्यांचे उद्घाटन झाल्यानंतरही वीज वितरण कंपनीने पथदिवे चालू न केल्याने संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर बस स्थानकासमोर काल मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश कानवडे, माजी तालुकाध्यक्ष दादासाहेब गुंजाळ, अमोल खताळ, दीपक भगत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.