अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर करणाऱ्या आजोबांपासून घरात काँग्रेसची विचारधारा रुजली. पक्षाशी निष्ठा ठेवून काम केल्याने आमदारकीपासून प्रदेशाध्यक्षापर्यंतचा प्रवास घडला.
सगळ्या पदांचा वापर करुन निळवंडे धरणाचे काम पूर्णत्वाला नेता आले, याचे समाधान आहे. ज्या दिवशी धरणाचे पाणी कालव्यांद्वारे दुष्काळीभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तो दिवस जीवनातील सर्वोच्च आनंद देणारा ठरेल, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
येथील राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहातर्फे संगमनेर फेस्टिव्हलच्या डिजीटल रंगमंचावर मंत्री थोरात यांची मुलाखत घेण्यात आली. रचना मालपाणी व डॉ. संतोष खेडलेकर यांनी विविध अराजकीय प्रश्नांतून त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा वेध घेतला.
बालपणापासून गांधीजींच्या विचारांची शिकवण मिळाल्याने कायम काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ राहिल्याचे त्यांनी सांगितले. लोकाग्रहास्तव १९८५ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, आणि संगमनेरकरांच्या प्रेमातुन त्यात यशही संपादन झाले. तेव्हापासून तालुक्यातील जनतेचे प्रेम मिळाल्याने सलग आठवेळा विजय मिळवला.
विविध विकास योजना तालुक्याच्या प्रत्येक वाडी- वस्तीपर्यंत नेण्याचे सुरुवातीपासून धोरण ठेवल्याने जनतेची कामे करता आली. अनियंत्रित वाहतुक व्यवस्थेसाठी बायपासची निर्मिती, प्रशासकीय भवन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, संगमनेर न्यायालय संकुल अशा शहराचे वैभव वाढवणाऱ्या
वास्तुंसह प्रवरा नदीवरील समांतर पुल या सारख्या कामांसाठी विविध योजनांतून निधी आणल्याचे त्यांनी सांगितले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीवर तालुक्यातील सहकाराचा वेलू गगनावर पोहोचला आहे. विविध सहकारी संस्था राज्यात आदर्श ठरतील असं काम करीत आहे.
शिक्षण, सहकार, कृषी आणि अर्थव्यवस्था या सर्वच क्षेत्रात संगमनेर तालुका राज्यासाठी मॉडेल ठरेल इतके काम येथे झाले आहे. पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीतून राज्यातही मोठे काम उभे राहिले, महसूल खात्यात विविध प्रयोग करुन सामान्य शेतकऱ्यांचे काम अधिक सहज करण्याचा सतत प्रयत्न केला.
यातून राज्यात संगमनेर तालुक्याचा लौकिकही वाढल्याचे त्यांनी सांगितले. ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासात विविध क्षेत्रातील राजकारण विरहित मित्रांचाही मोठा संच जमवता आला, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षीय संरचनेवर भाष्य करताना त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया व राहुल गांधी यांनी नेहमीच आपल्यावर विश्वास व्यक्त केल्याचा दाखला त्यांनी दिला.
अनेक दशकांपासून केवळ चर्चेत असणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामाला गती देण्याचे व ते पूर्णत्त्वास नेण्याचे कार्य आपल्या हातून घडले, हा जीवनातील सर्वात मोठा प्रसंग आहे. पुढील दोन वर्षात या धरणाच्या कालव्यांची कामे तडीस नेवून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ज्या दिवशी ते पूर्ण होईल, तो दिवस आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल असेही ते म्हणाले. प्रास्तविक संगमनेर फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी यांनी केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved