लग्नाळू नवरदेवांनो सावधान! अहिल्यानगरमध्ये लग्नासाठी पोरगी दाखवून गंडवणारी टोळी सक्रीय!

अनाथ आश्रमातील मुलींच्या लग्नासाठी जाहिरात करत अकोले तालुक्यातील टोळी सोशल मीडियावरुन लग्नाळूंना फसवत आहे. प्राथमिक शुल्क म्हणून १० ते १५ हजार रुपये उकळले जात आहेत.

Published on -

अकोले- तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या पालकांच्या विवशतेचा गैरफायदा घेणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीने सोशल मीडियाचा आधार घेत अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवले असून, प्राथमिक सदस्यत्वाच्या नावाखाली १० हजार रुपये उकळले जात आहेत.

विशेषतः वीरगाव परिसरातील अनेक कुटुंबे या फसवणुकीला बळी पडली आहेत. ही टोळी अनाथ आश्रमातून मुली उपलब्ध करून देतो, असे भासवत पालकांना फसवत असून, यामुळे स्थानिकांमध्ये संताप आणि अस्वस्थता पसरली आहे.

सोशल मिडियावरून जाहिरात

या टोळीचे कार्यपद्धती अत्यंत सुनियोजित आहे. सोशल मीडियावर “अनाथ आश्रमामध्ये लग्नासाठी मुली आहेत. जो कुणी लग्नासाठी इच्छुक असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा,” असा संदेश मोठ्या प्रमाणात पसरवला जातो. या संदेशाला भुलून जेव्हा पालक संपर्क साधतात, तेव्हा एक मंजुळ आवाजाची महिला त्यांच्याशी संभाषण करते.

या महिलेने मुलाच्या लग्नासाठी अनाथ आश्रमातील मुलगी मिळेल, असे आश्वासन देत प्रथम १० हजार रुपयांचे प्राथमिक शुल्क भरण्यास सांगितले जाते. पैसे भरल्यानंतर पालकांचा विश्वास संपादन करण्यासाठी चार-पाच सुंदर मुलींचे फोटो आणि बनावट नोंदणी पावत्या पाठवल्या जातात. या पावत्यांमुळे अनेक पालकांचा या टोळीवर विश्वास बसतो आणि ते पुढील पावले उचलण्यास तयार होतात.

अनेकांचा फसवणुकीचा अनुभव

पुढे या टोळीचे खरे रूप समोर येते. प्राथमिक शुल्कानंतर नोंदणीसाठी आणखी ५ हजार रुपये मागितले जातात आणि पैसे मिळताच संपर्क क्रमांक बंद होतो. अशा प्रकारे एका पालकांकडून १५ हजार रुपये उकळून ही टोळी आपले खिसे भरते.

वीरगावातील अनेकांनी या फसवणुकीचा अनुभव घेतला असला, तरी सामाजिक वाच्यता टाळण्यासाठी कोणीही पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस दाखवत नाही. परिणामी, ही टोळी बिनधास्तपणे आपला धंदा चालवत आहे आणि आणखी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे.

खोटारडेपणा उघड

या टोळीच्या फसवणुकीचे काही प्रत्यक्ष अनुभवही समोर आले आहेत. एका महिलेने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नंबरवर संपर्क साधून आपल्या मुलासाठी स्थळाची चौकशी केली. तिने विचारले की, “अनाथ आश्रमात येऊन मुलगी बघता येईल का आणि तिला घर दाखवता येईल का?” यावर समोरून प्रत्यक्ष भेटण्यास नकार देण्यात आला, ज्यामुळे या टोळीचा संशयास्पद हेतू उघड झाला.

दुसऱ्या एका महिलेने आपल्या भावासाठी स्थळाची माहिती मागितली. जेव्हा तिने मुलगा पोलिस सेवेत असल्याचे सांगितले, तेव्हा समोरून तत्काळ संभाषण तोडले गेले. या घटनांमधून ही टोळी किती चतुराईने आणि सावधपणे आपला गोरखधंदा चालवते, हे स्पष्ट होते.

कारवाईची मागणी

ही टोळी केवळ आर्थिक फसवणूकच करत नाही, तर भावनिकदृष्ट्याही पालकांना गंडवते. लग्नासाठी मुलगी मिळण्याची आस असलेल्या कुटुंबांना आशेचा किरण दाखवून त्यांचा विश्वासघात करणाऱ्या या टोळीवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News