Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात अंगावर काटा आणणारा थरार घडला आहे. वडिलांनीच पोटच्या मुलावर चाकूने सपासप वार करत मुलाचा निर्घृण खून केला.
केवळ शिवीगाळ करू नका असे म्हटल्याने वडिलांना राग आला व त्यांनी हे कृत्य केले. ही घटना नेवासे तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे ७ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती.

बापाने आपल्या पोटच्या मुलाचा चाकूहल्ला करून खून केल्याची घटना येथे घडली आहे. रवींद्र पुंड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भीमराज किसन पुंड असे आरोपी बापाचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी रात्री वडील व मुलगा हे घरात जेवण करत होते. त्यावेळी आरोपी वडील भीमराज किसन पुंड याने घरात मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलगा रवींद्र पुंड याने वडिल भीमराज यांना शिवीगाळ करू नका, असे सांगितले.
त्याचा राग मनात धरून समोरच असणाऱ्या हॉटेल कृष्णामधून चाकू घेऊन येत भीमराज पुंड याने मुलगा रवींद्र याच्यावर चाकुने सपासप वार केले. यातच रवींद्र पुंडचा मृत्यू झाला. अशी फिर्याद मृताची पत्नी ज्योती रवींद्र पुंड, रा. शिंगवेतुकाई शिवार, हॉटेल कृष्णामागे यांनी सोनई पोलिस ठाण्यात दिली.
त्यानुसार आरोपी भीमराज किसन पुंड याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी सोनई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी भीमराज पुंड याला ताब्यात घेतले.
आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता त्याला दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.