Ahilyanagar News: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मंगळवारी देशातील महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली व यानंतर महाराष्ट्रमध्ये आचारसंहिता लागू झाली.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याकरिता प्रशासनाच्या माध्यमातून देखील आता जय्यत अशी तयारी करण्यात येत असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावर काम सुरू करण्यात आलेले आहे.
या दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करता यावे याकरिता 120 पथके 24 तास कार्यान्वित राहणार असून जवळपास 145 जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.
या सगळ्या प्रसंगी कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नसल्याचा सज्जड इशारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत उमेदवारांना 40 लाख रुपये पर्यंत खर्च करण्याची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ किरण मोघे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
काय आहे अहिल्यानगर जिल्ह्याची मतदारांची स्थिती?
या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, मागच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात 36 लाख 59 हजार 541 मतदार होते. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत एक लाख 971 मतदार वाढले असून 12 मतदारसंघातील 37 लाख 60 हजार 512 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
या जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये 19 लाख 36 हजार 900 पुरुष मतदार असून 18 लाख 23 हजार 411 महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये 9686 सैनिक आणि 201 इतर मतदार आहेत.
उमेदवारांना भरावी लागणार 10000 अनामत रक्कम व खर्चाची मर्यादा आहे 40 लाख
या विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपये तर अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5000 इतकी अनामत रक्कम असणार आहे.
या निवडणुकीमध्ये उमेदवाराला खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली असून गेल्या निवडणुकीमध्ये खर्चाची मर्यादा सर्वसाधारण उमेदवाराकरिता 28 लाख रुपये होती. या विधानसभा निवडणुकीत मात्र खर्चाची मर्यादा तब्बल 12 लाख रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचे असे आहे निवडणुकीसाठी नियोजन
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून 3763 मतदान केंद्रांची संख्या आहे. यामध्ये 8531 बीयु, 4779 सीयू आणि 5155 व्हीव्हीपॅट मतदान यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी याकरिता प्रत्येक मतदान केंद्रांवर पाच कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी अशी नियुक्ती करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता 1884 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा देखील असणार आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 15000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या माध्यमातून देण्यात आली.
तसेच 145 जणांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटले. यामध्ये अवैध शस्त्र तसेच दारू, रक्कम आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
जिल्ह्यातील 55 हजार मतदारांना घरून करता येईल मतदान
गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे 85 वयापेक्षा अधिक वय असलेले मतदार व 40% पेक्षा अधिक दिव्यांग व कोविड बाधित मतदारांना घरून मतदानाची म्हणजेच होम वोटिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेष्ठ व दिव्यांग मिळून 55 हजार मतदारांची संख्या आहे.