Ahmednagar News : विक्रेत्यावर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीस सिनेस्टाईलने पकडले !

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : अगरबत्ती व चिप्स विक्रेत्याला रस्त्यात अडवून त्याच्यावर चाकूने वार करत लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगार असलेल्या फरार आरोपीला नगर तालुका पोलिसांनी शेतात सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आहे.

शुभम उर्फ बाबु दिलीप चौधरी (रा. खुंटेफळ, ता. आष्टी, जि. बीड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर खुनी हल्ल्याचे आणखी दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. लुटमारीची ही घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळी नगर – सोलापूर महामार्गावर वाटेफळ गावच्या शिवारात असलेल्या पुलाजवळ घडली होती.

या मारहाणीत सुशांत रमेश जंजिरे (वय २३, रा.हातवळण देवीचे ता. नगर), संतोष पुंडलिक खिलारे (रा. येळेगाव तुकाराम, ता. कळंबोली, जि. हिंगोली), रमेश जंजिरे, मुकुंद जंजिरे (दोघे रा. हातवळण, ता. नगर) हे चौघे जण जखमी झाले होते. याबाबत सुशांत जंजिरे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून फिर्याद नोंदविण्यात आली होती.

याप्रकरणी भवानी पवार (पुर्ण नाव गाव माहीत नाही ) सागर अशोक वाळके (रा. लोणी सय्यदमीर ता. आष्टी जि. बीड), शुभम उर्फ श्रीकेशर बंडु मोकळे (रा. वाटेफळ ता. नगर) व शुभम उर्फ बाबु दिलीप चौधरी (रा. खुंटेफळ, ता. आष्टी, जि. बीड) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील सागर अशोक वाळके व शुभम उर्फ श्रीकेशर बंडु मोकळे या दोघांना यापूर्वीच अटक केलेली आहे. तर सराईत गुन्हेगार बाबू चौधरी हा गेल्या अडीच महिन्यांपासून फरार होता. तो अरणगाव परिसरात आला असल्याची गोपनीय माहिती बुधवारी (दि. ११) सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांना मिळाली.

त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, उपनिरीक्षक रणजीत मारग, पोलिस अंमलदार सुभाष थोरात, विक्रांत भालसिंग, सागर मिसाळ, राहुल द्वारके, सोमनाथ वडणे, शिरसाठ, संभाजी बोराडे यांच्या समवेत अरणगावकडे धाव घेतली. पोलिसांची वाहने पाहताच आरोपी चौधरी हा अरणगाव बायपास चौकातून बाबुर्डी घुमटच्या दिशेने शेतातून पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe