पावसाचे माहेरघर असलेल्या ‘त्या’ तालुक्यात ढगफुटी..! जिल्ह्यातील ‘या’ नदीने ओलांडली धोक्याची पातळी?

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाने हाहाकार उडविला असून पाणलोटात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ७ हजार ५९० दशलक्ष घनफुटावर पोहचले आहे.कृष्णावंती नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने वाकी धरणावरून १०२२ क्युसेकने पाणी कृष्णावंती नदीमध्ये वाहत आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हा पावसाचा जोर बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून वाढला असून संध्याकाळी तो टिकून होता. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगरदऱ्यावरून धबधबे आक्राळ विक्राळ स्वरूपात कोसळत आहेत.

ढगफुटीसदृश पाऊस कोसळत असल्याने रस्त्यावर पाणीच पाणी दिसून आले. उडदावणे येथील नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत असून शिंगणवाडी गावाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे.

पांजरे गावाजवळही रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक थांबली गेली होती. प्रचंड पडत असलेल्या पावसामुळे आदिवासी बांधवांची भातशेती पाण्याखाली गेली असून अनेक शेतकऱ्यांच्या बांधफुटीच्या घटना घडल्या आहेत.

परिसरातील सर्वच भातशेती पाण्याखाली गेली आहे. २००४ साली अशाच पद्धतीने पाऊस पडल्याने धरण तीन दिवसात भरले होते. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात ढगफुटीसदृश पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरण ३१ जुलैपूर्वीच भरण्याचे संकेत मिळत आहेत.

मागील वर्षी भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रासह जायकवाडी धरणाच्या परिसरात पाऊस कमी पडल्याने भंडारदरा धरणातून पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा ६०० दशलक्ष घनफुटापर्यंत जाऊन पोहोचला होता.

त्यातच या वर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मान्सूनचे उशिरा आगमन झाले होते. त्यामुळे भंडारदरा धरणात पाणी जमा होते की नाही? असा प्रश्न अनेक जणांना पडला होता; मात्र १ जुलैपासून भंडारदऱ्यासह पाणलोटात मान्सूनचे जोरदार आगमन झाले.

आजपर्यंत पाऊस कोसळतच असून बुधवारी सकाळपासून पावसाने अक्षरशः हाहाकार उडविला. बुधवारी सकाळी सहा वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणामध्ये ६०४ दशलक्ष घनफुट पाण्याची आवक झाली आहे.

बुधवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत भंडारदरा धरण ७० टक्के भरणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

कळसुबाई शिखरावर जोरदार पाऊस पडत असल्याकारणाने कृष्णावंती नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने वाकी धरणावरून १०२२ क्युसेकने पाणी कृष्णावंती नदीमध्ये वाहत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा निळवंडे धरणाचा पाणीसाठा २६१० दशलक्ष घनफूट झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe