Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील ९६ मंडलांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली असून, या मंडलांमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या सवलती मिळणार आहेत. आमदार नीलेश लंके यांनी यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.
जिल्हयातील एकाही तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्याने आ. नीलेश लंके यांनी त्याविरोधात आवाज उठविला होता. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांची भेट घेऊन त्यांनी आपला अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला होता.
जिल्ह्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आ. लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचेही जाहिर केले होते. गुरूवारी आ. लंके यांनी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या स्थितीविषयी अवगत केले होते.
त्याच वेळी पाटील यांनी काही मंडलांचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत सामवेश करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. मंत्रालयात गुरूवारीच पार पडलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
बैठकीस अनिल पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे, गिरीष महाजन, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, या मंत्रयांसह मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त सचिव सोनिया शेट्टी उपस्थित होत्या.
जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती असतानाही केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या खाजगी यंत्रणेनेच्या अहवालात चुकीची माहिती देण्यात आल्याने जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करण्यात आला नव्हता.
ही बाब आ. लंके यांनी अभ्यासासह निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या समितीने आ. लंके यांच्या मागणीचा विचार करून समितीने १४ तालुक्यातील ९६ महसूल मंडलांचा दुष्काळ सदृश परिस्थितीच्या यादीत समावेश करण्यात आला.
दक्षिणेतील या मंडलांमध्ये दुष्काळसदृश स्थिती
पारनेर पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, निघोज, टाकळीढोकेश्वर, पळशी. नगर: नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिचोंडी पाटील, वाळकी, चास, रूई छत्तीशी, विरगाव, समशेरपुर. जामखेड आरणगाव,
खर्डा, नान्नज, नायगाव, कर्जत राशिन, भांबोरा, कंबोळी, मिरजगाव, माहीजळगाव पाथर्डी : मणिकदौंडी, टाकळीमाणूर, करंजी, मिरी शेवगाव भातकुडगाव, बोधेगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव. श्रीगोंदे श्रीगोंदे, काष्टी मांडवगण, बेलवंडी, पेडगाव, चिंभळे, देवदैठण, कोळगाव.
उर्वरीत मंडळांसाठीही प्रयत्न
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मंडळांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती जाहिर झाली नसून तिथे दुष्काळ सदृश स्थिती जाहिर करण्यासाठीही आपण पाठपुरावा करणार आहोत नीलेश लंके, आमदार.