Ahmednagar News : राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी या चार तालुक्यातील कोरडवाहू भागाचे नंदनवन करणाऱ्या वांबोरी चारीकडे सत्ताधाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष तर प्रशासनाची अनास्था पाहता लाभार्थी शेतकऱ्यांसह कार्यालयात ठिया द्यावा लागले. पाटबंधारे प्रशासनाने दहा दिवसातच वांबोरी चारीचे बंद पडलेले पंप तसेच यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रलंबित कामे पूर्ण न केल्यास रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा मा मंत्री व आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर आधारित व राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी परिसरातील जिरायत गावांना वरदान असलेल्या वांबोरी चारी बंद अवस्थेत आहे. वांबोरी चारीची नादुरुस्त तिसरी मोटार कार्यान्वित करीत योजनेद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी उपाययोजना करण्यासाठी पाटबंधारे प्रशासनाने प्रयत्न करावे. जर पुढील दहा दिवसात वांबोरी चारीचा प्रश्न मार्गी न लागल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
नगर येथील पाटबंधारे प्रशासनाच्या जलसिंचन भवनातील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या कार्यालयात आ. तनपुरे यांसह वांबोरी चारी लाभार्थी शेकडो शेतकर्यांनी ठिया दिला होता.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता सायली पाटील, यांत्रिकी विभागाचे उपकार्यकारी अभियंता थोरात, राहरी यांत्रिकी विभागाचे गिर्हे, उपअभियंता विलास पाटील, वांबोरी शाखेचे खाभियंता विजय मोगल यांनी वांबोरी चारीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
यावेळी आ. तनपुरे म्हणाले की, मुळा धरण साठा निम्याच्या पुढे गेला आहे. लवकरच धरण भरण्याच्या मार्गावर आहे. धरण भरल्यानंतर अतिरीक्त पाण्यातून वांबोरी चारीमार्फत ४५ गावांमधील १०२ तलावात पाणी जमा होते.
शेती सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वांबोरी चारी महत्वाची आहे. यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत वांबोरी चारीच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
पाटबंधारे विभागाचे अधिकारी तथा काम करणारे ठेकेदार वेगवेगळे कारणे दाखवित कामकाजात विलंब करत आहेत. वांबोरी चारीचे पाणी पूर्ण दाबाने मिळावे म्हणून पाटबंधारे विभागाने धरण पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वीच सतर्कता राखावी.
धरण भरल्यानंतर अतिरीक्त जमा होणाऱ्या पाण्यातून वांबोरी चारीच्या माध्यमातून टेल टू हेड तलाव भरून द्यावेत अशी मागणी केली.
आ. तनपुरे यांनी पुढील दहा दिवसात वांबोरी चारी संदर्भात तीन पंपापैकी बंद पडलेला पंप तत्काळ दुरुस्त करावा, यांत्रिकी व तांत्रिक विभागाचे कामकाज पूर्ण करावे. अन्यथा रस्त्यावर उतरत आंदोलन हाती घेणार असल्याचा इशारा दिला.
पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील व अधिकार्यांनी वांबोरी चारी सुरू होण्यासाठी कोणताही अडसर राहणार नाही याची काळजी घेत पंप दुरूस्ती तसेच सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून टेल टू हेड पाणी जाण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.