कमिशन एजंटाचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला; या देवस्थानच्या ठिकाणी घडली घटना

Published on -

Ahmednagar News :

जिल्ह्यातील प्रख्यात असलेल्या नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र अनेकदा या भाविकांना येथील कमिशन एजंटाच्या त्रासाला सामोरे जावे लावत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

कमिशन एजंटाच्या या होणाऱ्या जाचाला कंटाळून अनेक भाविक तर रस्त्यारूनच दर्शन घेतात. आता तर येथील कमिशन एजंटाने कहरच केला आहे.

शनिशिंगणापूर येथील पथकर नाक्यावर कमिशन एजंटाने तेथे कार्यरत असणारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एकजण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी शिंगणापूर बंद ठेवून निषेध करण्यात आला. यावेळी शिंगणापूर पोलिसांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी अविनाश दादाहरी सावंत, सागर भिमराव शिंदे (दोघे रा.मुळा कारखाना) या दोघांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील प्रवासी टोलनाक्यावर ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ बानकर टोल वसुली करीत असताना कमिशन एजंटाने बानकर यांना अविनाश दादाहरी सावंत, सागर भिमराव शिंदे त्याकडून पथकर पावती घेऊ नकोस असे म्हणत शिवीगाळ केली.

यावेळी सागर भिमराव शिंदे याच्या हातात कोयता होता, त्यामुळे त्याला घाबरून बानकर भाविकांच्या वाहनात बसले, तेव्हा शिंदे याने त्याच्या हातात असलेल्या धारदार कोयत्याने त्या वाहनावर जोरात मारून गाडीचे नुकसान केले.

या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य घटनास्थळी आले. तोपर्यंत आरोपी पळून गेले. ग्रामपंचायत प्रशासनाने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले. या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी शिंगणापूर बंद पाळण्यात आला. या कमिशन एजंटाचा बंदोबस्त करण्याचे पोलिसांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी निवेदन स्वीकारले. दुपारी बारानंतर दुकाने उघडण्यात आली. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सरपंच बाळासाहेब बानकर, बापूसाहेब शेटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रकरणी सोमनाथ अशोक बानकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिंगणापूर पोलिसांनी अविनाश दादाहरी सावंत, सागर भीमराव शिंदे (दोघेही रा. मुळा कारखाना) आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने आरोपींना चार दिवस पोलिस कोठडी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe