Ahmednagar News : सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहेत. आणि त्याचे परिणाम जिल्ह्यासह गावा गावात होत असल्याचे दिसून येत आहे.
श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष राजकारणात वर्चस्व असलेले काँगेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्यात राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत दाखल झाले.
नागवडे दाम्पत्याच्या प्रवेशाबाबत मागील महिन्यामध्ये स्व. शिवाजीबापू नागवडे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती सूचक मानली जात होती. ना.पवार यांनी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नागवडे कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते.
त्यातच नागवडे दांपत्याने विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढविण्याचा निर्धार करत मागील आठवड्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आता माघार नाही असा पवित्रा घेत जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची आग्रही भूमिका मांडली होती.
श्रीगोंदा तालुक्यात नागवडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. साखर कारखान्याच्या, शिक्षण संस्थांच्या माध्यमांतून नागवडे यांचे तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. याचा मोठा फायदा आता राष्ट्रवादीला होणार आहे.
नागवडे यांच्या पक्षप्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात अजित पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून लोकसभेनंतर होणारी विधानसभा निवडणूक लक्षवेधी अशीच असणार आहे.