कोरोनामुळे निधन झालेल्यांची मृत्युनंतरही अवहेलना !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-कोरोनामुळे मरण पावलेल्यांची निधनानंतरही अवहेलना होण्याची घटना नगरमध्ये घडली आहे. सिव्हीलमध्ये रविवारी निधन झालेल्या १२ जणांचे मृतदेह चक्क एकाच शववाहिकेत कोंबले गेले होते.

त्यांची ती अस्ताव्यस्त स्थिती पाहून कोरोना झालेल्यांना आता जसे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरू झाले, तसे त्यांचे निधन झाल्यावरही त्यांची अवहेलनेतून सुटका होत नसल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे. नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमधील या असंवेदनशीलतेची महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी छायाचित्रे काढली असून,

तातडीने सिव्हीलची स्थिती सुधारली नाही तर शिवसेना आक्रोश आंदोलन करील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मित्राच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्यावर त्यांच्यावर अंत्यविधी नीट होतात की नाही, हे पाहण्याच्या निमित्ताने बोराटे रविवारी सिव्हील हॉस्पिटलला गेले होते. तेथील विदारक दृश्य पाहून त्यांनाच अस्वस्थ झाले.

शववाहिकेत कोरोनामुळे मरण पावलेल्या ४ महिला व ८ पुरुषांचे मृतदेह अस्ताव्यस्त फेकून दिले गेले होते. कोरोनामुळे निधन झालेल्यांचे अंत्यविधी परस्पर होत असल्याने या निधन झालेल्यांचे कोणीही नातेवाईक तेथे नव्हते. शववाहिकेत हे १२ मृतदेह कोंबून त्यांना अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी नेण्याची तयारी सुरू होती.

तो सगळा प्रकार पाहून तसेच मानवतेला काळिमा फासणारी आणि कोरोनामुळे निधन झालेल्यांची मृत्युनंतरही अवहेलना सुरू असल्याचे पाहून बोराटेंनी या प्रकाराचे फोटो मोबाईलमध्ये काढले व शिवसेनेच्या आक्रोश आंदोलन इशारा पत्रासमवेत मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना पाठवून दिले.

घडलेला प्रकार अत्यंत क्लेशदायक, धक्कादायक व मानवतेला काळिमा फासणारा आहे. माणसांची किंमत प्रशासनाला राहिली नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यामुळे सिव्हीलमध्ये कोरोना उपचारांसाठी दाखल असलेल्यांवर तरी योग्य उपचार होतात की नाही, याचीही शंका येऊ लागली आहे, असे म्हणणे बोराटेंनी पत्रात मांडले आहे.

प्रशासनाचा भोंगळ कारभार यातून स्पष्ट झाला आहे. दोन दिवसात या कारभारात सुधारणा झाली नाही तर वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रार करण्याचा व शिवसेनेद्वारे आक्रोश आंदोलन करण्याचा इशाराही बोराटेंसह नगरसेविका मंगला लोखंडे व शिवसेनेचे कार्यकर्ते विशाल वालकर यांनी दिला आहे.

दरम्यान, सिव्हीलमध्ये कोरोना मृतदेहांची विटंबना होत असल्याचे दाखवणारी छायाचित्रे व्हॉटसअॅपद्वारे व सोशल मिडियाद्वारे शहरभर व्हायरल झाली, त्यानंतर शहरभरातून या प्रकाराचा निषेध झाला. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर नगरकरांनी टीकेचे आसूड ओढले व दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment