अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माउलींनी पसायदान मागितलं. त्यांनी नेवाशात ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आता नेवाशातूनच कोरोनमुक्तीचे पसायदान मागितले जात आहे.
नेवासातील नारायण महाराज ससे यांनी माऊलींच्या पसायदानावर आधारित कोरोना मुक्तीचे पसायदान मागितलेले आहे. सध्या हे कोरोना मुक्ती पसायदान तालुक्यातील मंदिरांबाहेर भिंतीवर सर्वत्र चिकटविलेले दिसून येत आहे.
यामधून सर्व जीवांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, घरातच निवांत बसून रहावे. एकमेकांशी हात न मिळवता दुरूनच नमस्कार करावा.
सुरक्षित अंतर ठेवावे.थंड ऐवजी कोमट पाणी प्यावे.घरात बसून कंटाळा आला तर गृहिणीला मदत करावी, घराची, मनाची व तनाचीही साफसफाई करावी आदी उपदेश केला आहे.
नारायण महाराज ससे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग,प्रशासन विविध उपाययोजना करत समाजात जनजागृती करत असताना
आम्ही संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदानाचा संदर्भ घेत शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन या पसायदानातून करण्यात आले आहे.
* करोना पसायदान
आता सर्वात्मके जीवे। विनाकारण न फिरावे॥
घरीच बैसूनी रहावे। निवांतपणे॥
एकमेका कर न मिळवावे। दुरुनीच नमस्कारावे॥
अंतर सुरक्षित राखावे। परस्परामाजी॥
सर्वसर्वदा हात धुवावे। रूमालविना न शिंकावे॥ कोमट जल प्राशावे। थंड वर्जावे सर्वथा ॥
घरी येता जरी कंटाळा। मदत करावी गृहिणीला॥
पुण्य लगे जीवाला। पतीव्रतेचे॥
करा स्वच्छता सदनाची। त्याच बरोबर तनाची॥
काढा जळमटे मानाची। शुचिर्भूत व्हावया॥
करा मनन आणि चिंतन। थोडा वेळ नामस्मरण॥
चुकविता येईल मरण। स्वतःसहित इतरांचे॥
आज पावे तो खूप पळाला। आता विश्रांती शरीराला॥
सादर व्हावे समयाला। संत वचन हे असे॥
आहे विषाणूचे संकट। करा मनाला बळकट॥
ध्यान योगाचा वज्रटत। उभारावा भोवताली॥
समय नव्हता म्हणो। केले नसेल वाचन॥
ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन। आता तरी वाचावा॥
आयुष्याला पुरेल। पुरोनिया उरेल॥
ग्रंथाची ऐसी रेलचेल। आहे संत कृपे॥
अवाहन करिती वारंवार। दिल्ली आणि मुंबईकर॥ धोका वाढेल फार । बेफिकीर रहाता॥
शासन, पोलीस, डॉक्टर। स्वच्छतेचे हे शुरवीर॥
सेवा देतो अहोरात्र। स्मरण त्याचे असावे॥
हे ही जातील दुःखदिन। येतील पुढे सुखाचे क्षण॥
तोवर संयमाचे पालन। मनापासोन करावे॥
येथे म्हने श्री निसर्ग रावो। कोरोना ना पसरावो॥
हाच हेतु मनी ध्यावो। जन कल्याण हेतुने॥
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved