कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्वच स्तरावरून युद्धपातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार संचारबंदी लागू आहे.
पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचे नाही व त्यांनीही सोशल डिस्टन्सिंग पाळायचे असा आदेश असल्याने मार्च व एप्रिल महिन्यांतील लग्न तिथी रद्द झाल्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली. कोरोनामुळे शुभ कार्यात विघ्न आल्याने वधू-वर पिता चिंतेत आहेत. कोरोनाने जगभर हैदोस घातला आहे. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही मोठया प्रमाणात जाणवत आहेत.
त्याला प्रतिबंध करण्यासाठी व पुढील धोका टाळण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलून लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली, त्याचा फटका लग्न समारंभांनांही बसला आहे. सध्या २२ मार्च ते ३ मे पर्यंत हा लॉकडाऊन असून या काळातील अनेक लग्नसोहळे रद्द करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रभर लग्नांवर मोठे विघ्न आले आहे.
ज्या वधू-वर पित्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे ते थाटामाटात लग्नसोहळा साजरा करतात. तर ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे ते आपल्या परीने छोट्या-मोठया पद्धतीने लग्न सोहळा पार पाडतात. मात्र या कोरोनाच्या विषाणूचा गरीबांसह श्रीमंतांनाही फटका बसला असून, लग्न समारंभाशी संबंधित व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
विवाह सोहळे, ग्रामजत्रा, आठवडे बाजार असे लोकांची गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर पूर्णत: अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे. प्रामुख्याने मंगल कार्यालय मालक, मंडप डेकोरेटेर, बँड पथक, आचारी, वाढपी, भटजी, सजावट करणारे कारागीर, लग्नपत्रिका छापणारे, फूल उत्पादक, वाहन चालक-मालक आदि व्यावसायिक संकटात सापडले आहेत.