अहमदनगर लाईव्ह 24 टीम : भारतात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात या आजाराचा फारसा धोका दिसत नसला, तरी आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य विभागांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
दिवसंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने दक्षता म्हणून जिल्हा रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील शिर्डी विमानतळ व आरोग्य केंद्रांना याबाबत सूचना दिल्या आहेत. चीनमधील काही प्रांतांत या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. या आजारामुळे काही जणांचा मृत्यूही झाला आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयांच्या सिव्हील सर्जनना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांना पत्र पाठवून त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.