दौंड- उस्मानाबाद अरुंद रस्त्यामुळे बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याचा धोका

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राशीन हे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या जगदंबा देवीचे तीर्थक्षेत्र आहे. तसेच कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या राशीनच्या मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या दौंड- उस्मानाबाद राजमार्गाचे काम बाजारपेठेत अरुंद करण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारांनी घातल्यामुळे राशीनची बाजारपेठ उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वीच्या गटारीची हद्द कायम करून रस्त्याचे काम केल्यास कोणत्याही व्यावसायिकाचे नुकसान न करता रस्ता रुंद होईल. यासाठी खासदार सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे, या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राशीनमधील व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे

तसेच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर टाकण्यात येणारे दुभाजक आणि स्ट्रीट लाईट बाजारपेठेच्या बाहेर करमाळा रस्त्यावर टाकण्याचे नियोजन आहे. याबाबत राशिनकरांना कुठलीही कल्पना नाही. येथील काम तातडीने उरकण्यासाठी सर्व अतिक्रमणे जाग्यावर ठेवून त्याच्या अलीकडे गटारीचे काम सुरू करण्यात आले आहे.

त्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री जगदंबा देवीच्या दसरा उत्सवाच्या तोंडावर मुख्य बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून चौकामधील प्रवेशद्वाराजवळ फक्त गटारीचे खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दसऱ्यापर्यंत गटारीचे काम पूर्ण करा अन्यथा खड्डे बुजवा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

राशीनच्या बाजारपेठेतील रस्ता प्रशस्त होण्यासाठी खासदार सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. निलम साळवे सरपंच, राशीन.

जुन्या गटारापर्यंत हा रस्ता करण्यात यावा तसेच चौकामधील प्रवेशद्वारास तडा गेल्याने ते धोकादायक झाले आहे, ते काढून त्या ठिकाणी नवीन प्रवेशद्वार करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक नेते श्याम कानगुडे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe