Ahmednagar News : पावसाने पाठ फिरवल्याने संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे संगमनेर तालुक्याला तर कोरडा दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत तहसीलदारांना नुकतेच निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापुस, भुईमूग हे पिके पुर्णपणे जळाली आहे.

तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई घ्यावी. ज्या गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
अशा गावांना टँकर मार्फत पाणी पुरवठा चालू करण्यात यावा. नाफेडच्या जाचक अटी व शर्थी शिथिल करून नियम बदलण्यात यावेत, शेतकरी बांधवांना दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन भरीव मदत करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे, युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, शहर संघटक दीपक साळुंखे, रंगनाथ फटांगरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.