Ahmednagar News : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलच्या शरद खंडू पवार यांनी सरपंच पदाचा दुरुपयोग करत आमची जाणीवपूर्वक राजकारण करत आमची बदनामी करत असल्याचे ब्रम्हचैतन्य महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगल दिलीप कोकाटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ब्रह्मचैतन्य स्वयंसहायता महिला बचत गटाने गेली १८ वर्ष चिचोंडी पाटील गावातील अंगणवाड्यांना उत्कृष्ट आहार पुरविलेला आहे. १८ वर्षात अद्यापपर्यंत आहाराबाबत एकही तक्रार आलेली नाही.
नियमानुसार बचत गटाचा दिलेला आहार हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी तपासून घ्यायचा असतो. आधी त्यांनी तो आहार खायचा असतो आणि नंतर अंगणवाडीतील मुलांना द्यायचा असतो.
शासकीय नियतन कमी प्रमाणात आणि निकृष्ट येत असते. ते स्वच्छ करण्यासाठी वेळ आणि मनुष्यबळ लागत असते. दीपावलीमध्ये महिला कामगार मिळाले नसल्यामुळे आहार वाटपात विलंब झाला होता.
तसेच दीपावली नंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप सुरू असल्यामुळे त्यांनी आहार स्वीकारला नाही. या सर्व बाबी आम्ही शासनाला लेखी स्वरुपात कळविलेल्या आहेत. हे मुद्दे शासनाने तपासायचे असताना सरपंच पवार गावात विकासाचे काम सोडून कारस्थान आणि षडयंत्र करत असल्याचा आरोप केला आहे.
चिचोंडी पाटील गावामध्ये अंगणवाड्यांसोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ही विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. याची चौकशी सरपंच यांनी का केली नाही असाही सवाल कोकाटे यांनी केला आहे.
माझे पती दिलीप रामभाऊ कोकाटे यांनी सरपंच पवार यानी सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण, ग्रामपंचायत मधील गैरकारभार बंद व्हावा, दादागिरी बंद व्हावी यासाठी शासकीय पातळीवर लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला आहे.
याचा राग म्हणून त्यांच्या अंगावर चार चाकी गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी आमची बदनामी चालू आहे.