अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- कोरोनाच्या संकटातून सावरणार्या शहरातील पथ विक्रेत्यांना आर्थिक व मानसिक त्रास देणार्या हिंदूराष्ट्र सेनेवर कारवाई व्हावी व महापालिकेकडून शहरातील कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली या मुख्य बाजारपेठेत पथ विक्रेता
अधिनियमाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली पथ विक्रेते संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले.
पथ विक्रेत्यांनी सदर प्रश्न मांडला असता जिल्हाधिकारी भोसले यांनी या संदर्भात महापालिकेत बैठक घेण्यात येणार असून, पथ विक्रेत्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी साहेबान जहागीरदार, रमेश ठाकूर, अकलाख शेख, इरफान मेमन, जुनेद शेख, नवेद शेख, यासीन पवार, इम्रान शेख, फैरोज शेख, नरेश नारंग, जाकीर शिकलकर आदींसह हॉकर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली या भागात अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या अनेक पथविक्रेते विविध वस्तूंची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करीत आहे. कोरोनाच्या टाळेबंदीत सदर पथविक्रेत्यांना मोठा त्रास झाला. सर्वांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.
शासनाकडून पथविक्रेत्यांना कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पथविक्रेत्यांनी प्रमाणिकपणे आपला व्यवसाय पुन्हा सुरु केला आहे. मात्र हिंदूराष्ट्र सेनेसारखे जातीयवादी प्रवृत्तीच्या संघटना वारंवार या भागातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करुन शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे.
या भागातील स्थानिक नागरिक, व्यापारी व महिलांना कोणताही त्रास नसताना आर्थिक हित साधण्यासाठी हीच संघटना या भागातील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा वारंवार उपस्थित करीत आहे. या संघटनेतील अनेकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, या संघटनेच्या काही पदाधिकार्यांना तडीपार करण्यात आले आहे. तर काहींवर खंडणी वसूल करण्याचे गुन्हे दाखल आहेत. सर्वसामान्य हॉकर्स बांधवांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याच्या उद्दीष्टाने सदर संघटनेचे कार्यकर्ते पत्रकबाजी करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
तर शहरात इतर भागात मोठ्या धेंड्यांची पक्की बांधकामांचे अतिक्रमण असताना या संघटनेला वारंवार गोर-गरीब अल्पसंख्यांक समाजाचे अतिक्रमण दिसत असल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला आहे. केंद्र शासनाने पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम 1 मे 2014 रोजी संपूर्ण देशात लागू केला. सदर कायद्यान्वये विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास संरक्षण दिलेले आहे.
हा कायदा लागू झाल्यापासून सहा महिन्याच्या आत रस्त्यावरील पथ विक्रेत्यांचे सर्व्हेक्षण करुन हॉकर्स व नो हॉकर्स झोन तयार करुन पथ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी परवाना देण्याची कार्यवाही करण्याचे सुचित केले आहे. परंतु अहमदनगर महापालिकेकडून सदर अधिनियमाची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही. हॉकर्स संघटनेचा 2010 पासून महापाकिकेकडे पाठपुरावा करीत आहे.
महापालिकेने याबाबत सर्वेक्षण करुन तातडीने शहरातील कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली या मुख्य बाजारपेठेत पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करुन हॉकर्सना व्यवसाय करण्यासाठी संरक्षण देण्याची मागणी कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली पथ विक्रेते संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved