नगर-जामखेडच्या खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- नगर-जामखेड रस्त्यावर असलेल्या सांडवा फाटा ते मांडवा पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविण्यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, युवक अध्यक्ष बापू खांदवे, शहराध्यक्ष शहानवाज शेख,

महाराष्ट्र राज्य सचिव अमित गांधी, मच्छिंद्र गांगर्डे, मनोहर खांदवे आदी उपस्थित होते. नगर-जामखेड रस्त्यावरील सांडवा फाटा ते मांडवा दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.

सदर रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे असल्याने खड्डे चुकविताना वाहनांचे लहान-मोठे अपघात घडत आहे. नागरिकांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत असून, जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.

या भागात असलेल्या खडी क्रेशरमुळे अवजड वाहनांची वाहतुक दररोज सुरु असल्याने देखील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

तातडीने सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा येत्या पंधरा दिवसात संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment