अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- मुकुंदनगर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरी समस्यांबाबत नगरसेवक आसिफ सुलतान यांनी सर्वसाधारण सभेत महापौर व आयुक्तांना निवेदन दिले.
प्रभाग 3 मध्ये 35 ते 40 हजार लोकसंख्या असून, येथे पाणीपुरवठा, घनकचरा, ड्रेनेजलाईन व गटार, इलेक्ट्रिकल, बांधकाम आदी प्रलंबीत प्रश्नामुळे नागरी सुविधेचा बोजवारा उडाला असून, सदर प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रभाग 3 मध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे.

या भागात एक दिवसाआड पाणी सोडले जाते, तर काही ठिकाणी सदर भागात अनियमित दोन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. वितरण व्यवस्थेतील दोष व कर्मचार्यांची कमतरता या कारणांनी पाणीपुरवठा नागरिकांना सुरळीत होत नाही. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
फेज टू चे पाईपलाइनचे काम 90 टक्के पुर्ण झाले आहे. उर्वरीत काम पुर्ण करुन नागरिकांना फेज टू च्या लाईन मधून नळ कनेक्शन देऊन पाणी पुरवठा व्हावा. या भागात पाणीपुरवठा करणार्या टाकीची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून त्यामधून पाण्याचे वाटप करण्यात यावे. स्वच्छता कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने सदर प्रभाता पुरेशी स्वच्छता होत नाही.
परिणामी या भागात अस्वच्छता पसरुन कचर्याचे ढीग साचत आहे. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, या भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, स्वच्छतेसाठी कर्मचार्यांची संख्या वाढवावी, नागरिकांना कचरा डबे महापालिकेतर्फे पुरविण्यात यावे व साचलेला कचरा उचलण्यासाठी लहान कचरा गाड्या उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या भागात अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईन तुंबून घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेजलाईनचे फुटलेले पाईप दुरुस्त करुन त्याची दुरुस्ती व्हावी. तसेच पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधकार पसरला आहे. रात्री लहान मोठे अपघात घडत आहे.
तर शहरात चोर्याचे प्रमाण वाढत असताना पथदिवे दुरुस्त करण्यात यावे. अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्याची देखील तातडीने दुरुस्ती व्हावी, उद्यान विकासासाठी सुचवलेल्या कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे,
मुकुंदनगरसाठी शासनाकडून भुयारी गटार योजना मंजूर असून त्याचे काम सुरु करावे, सदर प्रश्न सोडविण्यासाठी चार दिवसात आढावा बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास येत्या पंधरा दिवसात शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक आसिफ सुलतान यांनी दिला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com