Ahmednagar News :- प्रवरा नदीपात्रात रसायनयुक्त काळे पाणी सोडणा-यांची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी संगमनेर यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.
निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी असतानाही आवर्तन सुरू होताच सलग दोन ते तीन दिवस या पाण्यात रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्याचे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

याबाबत प्रवरा नदी बचाव कृती समीतीने महसूल, पशुसंवर्धन, जलसंपदा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांना याची गंभीर दखल घेण्यास सांगितले होते. आज प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने संगमनेरचे प्रांतांधिकारी हिंगे यांची भेट घेवून त्यांना रसायनयुक्त पाणी सोडणा-यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या शिष्टमंडळाने मागील काही दिवसांपुर्वी प्रवरा नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देत. या पाण्याचा मोठा त्रास नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना होत आहे. या पाण्यामुळे शेतीजमीनीची हानी होत आहेच परंतू पिण्याच्या पाण्यासाठी हेच पाणी वापरले जात असल्याने ग्रामस्थांसह जनावारांचे आरोग्यही धोक्यात येत असल्याची बाब शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांच्या लक्षात आणून दिली.
नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या रसायनयुक्त पाण्याचा त्रास झाल्यानंतर गावोगावी प्रवरा नदी बचाव कृती समिती स्थापन करून या विरोधात आंदोलन केले होते. आता पुन्हा तीच वेळ पुन्हा आल्याने रसायनयुक्त पाणी सोडणा-यांची चौकशी करून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या शिष्टमंडळाने निवेदनात दिला आहे. याप्रसंगी सचिन शिंदे, राहूल दिघे, रविंद्र थोरात, रविंद्र गाढे, गोकुळ दिघे, उतम वर्पे, प्रविण शेपाळ, दादा गुंजाळ, इंद्रभान दिघे, अमोल खुळे, ज्ञानदेव पर्बत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.