Ahmednagar News : शिर्डीची उमेदवारी राधाकृष्ण विखे यांना देऊ नये, म्हणून भाजप पक्षश्रेष्ठींकडे पत्रव्यवहार केला आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे.
तेच ते चेहरे ६० वर्षांपासून आहेत. एकाच कुटुंबात सत्ता आहे. २००९ मध्ये मला सर्वाधिक ६७ हजार मते मिळाली होती. मागच्या निवडणुकीत मलाच उमेदवारी होती. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशाने माझी उमेदवारी हुकली, पण यंदा आपण इच्छुक असून, शिर्डीतून लढण्याची संधी देण्याची मागणी पक्षाकडे करणार असल्याचे शिर्डी भाजपचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले.

डॉ.पिपाडा यांनी बुधवारी सकाळी नगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, नगर शहरात नाही, एवढी दहशत शिर्डीत आहे.
या भागात भाजपची ताकद वाढावी यासाठी विखेंना पक्षात घेतले. त्यानंतर त्यांना मंत्रीपद देखील दिले, पण त्यांनी पक्षाची ताकद वाढणे तर दूरच परंतु शिर्डीतील पक्ष व कार्यकर्ते संपवण्याचे काम केले. त्यांनी तेथे उघडलेले संपर्क कार्यालय’ मोक्कातील आरोपीचे असल्याचा आरोप देखील डॉ. पिपाडा यांनी केला.
तसेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माजी खा. सुजय विखे यांच्याविरोधात नाराजी होती व त्यावेळी नगरचा उमेदवार बदलण्याचीही मागणी झाली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. आता तशीच स्थिती शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील आहे.
येथेही भाजपमधून उमेदवारी बदलण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे नगरप्रमाणे शिर्डीतही होऊ नये, म्हणून पक्षाने शिर्डीचा उमेदवार बदलावा. अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली असून शिर्डीतून उमेदवारीस आपण इच्छुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात विखे यांना पक्षातून विरोध केला जात असल्याचे दिसत आहे.
त्याचसोबत साई मंदिरात फुले व प्रसाद नेऊ दिला जात नसल्याने परिसरातील फूल उत्पादकांचे नुकसान होत आहे. युवकांमध्ये बेरोजगारी आहे. संस्थानचे रुग्णालय बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आंदोलन केल्यानंतर शैक्षणिक संकुल सुरू केले. २० वर्षांपासून राहाता परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे माझे प्रयत्न पूर्ण होऊ दिले नाही. संस्थानचे ५९८ कर्मचारी कायम होऊ दिले नाहीत. असा आरोप देखील पिपाडा यांनी केला.