Ahmednagar News : राहुरी येथील डॉ. बी. बी. तनपुरे साखर कारखाना मागील अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. बँकेवरील थकीत कर्ज असेल किंवा कामगारांचे पगारापोटी झालेले आंदोलने असतील विविध मुद्द्यांवरून हा कारखाना नेहमीच अग्रस्थानी राहिला.
दरम्यान आता हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केली आहे. त्यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या आहेत. जास्त बोली लावणाऱ्यास हा भाडेतत्वावर दिला जाईल.
यासाठी आता पर्यंत तब्बल पाच निविदा अर्जाची विक्री झाली आहे. ३० ऑक्टोबर पर्यंत निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. जिल्हा बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी १२ ऑक्टोबर पासून निविदा फॉर्म विक्रीला सुरुवात झाली.
आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातून एक, अहमदनगर जिल्ह्यातून एक व पुणे जिल्ह्यातून तीन जणांनी निविदा अर्ज नेले आहे. एका अर्जाची किंमत ३० हजार रुपये आहे. निविदा उघडण्याची तारीख निश्चित झाल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळासमोर निविदा उघडण्यात येतील.
* कारखान्याकडे १२४.७५ कोटी थकबाकी आहे
कारखान्याकडे ९० कोटी ३ लाखांची मुद्दल व ३४ कोटी ७२ लाख व्याज असे एकूण १२४ कोटी ७५ लाखांची थकबाकी आहे. कारखान्याचे मुल्यांकन निश्चित झाल्यानंतर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची निविदा सूचना जिल्हा बँकेने जारी केली. परंतु, कारखान्याच्या मूल्यांकनाचा आकडा गुलदस्त्यात आहे.