भंडारदरा धरणातून सध्या सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून तालुक्यातील गावतळे भरून द्यावीत, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक व जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पावसाळा सुरू होऊन देखील अद्याप श्रीरामपूर तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. अनेक गावात पिण्याच्या पाणी योजनेचे तलाव कोरडे होत आहेत.
त्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या पाण्याची, दैनंदिन वापराच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या गाव तळ्यामध्ये पाणी सोडले नाही तर अनेक ठिकाणी टँकर सुरू करावे लागतील, अशी स्थिती निर्माण होणार आहे.
सद्या भंडारदरा धरणातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनातून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व गावतळ्यात पाणी सोडण्यात यावे, यासाठी आमदार लहू कानडे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गावळ्यात पाणी सोडण्यासंबंधी सुचना केल्या आहेत.
त्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यानुसार तालुक्यातील गावतळी आवर्तनातून भरून द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा गुजर, नाईक व मुरकुटे यांनी दिला आहे.-