अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी निवडणुकीचा सामना अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागले आहे. असाच काहीसा प्रकार नेवासा तालुक्यातील निवडणुकांदरम्यान दिसून येत आहे.
नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या जानेवारी महिन्यात होत आहेत. त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झाली असून, गावागावांत राजकीय फड रंगू लागले आहेत.
नेवासा तालुक्यातील 144 ग्रामपंचायतपैकी 90 टक्के ग्रामपंचायतीवर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व असून होणार्या निवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहील यासाठी गडाख गट सक्रिय राहील.
मात्र तालुक्याच्या राजकारणात आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गट देखील निवडणुकीच्या मैदानात सक्रिय राहतील. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता धूसरच आहे.
सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्याने तालुक्यात शिवसेनेचा गडाख गट, राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग अभंग, काशिनाथ नवले हे महाआघाडीतील घटक पक्षांनाही बरोबर घेऊन समन्वयाने सक्रिय आहेत.
भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे सक्रिय असले तरी ते या निवडणुकीत एकाकी पडलेले दिसतात. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते सक्रिय असले तरी गावपातळीवर ते पक्षविरहित एकमेकांना सहकार्य करतील असे दिसते. त्यामुळे तालुक्यात गडाख मुरकुटे अशीच लढत होईल असे दिसते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved