बालिकाश्रम रस्ता, बोल्हेगावात महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे हटवली !

लवकरच संपूर्ण बालिकाश्रम रस्ता मोहीम राबवून अतिक्रमणमुक्त करणार कारवाईसाठी महानगरपालिकेचे पथक सज्ज; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

Ahmednagarlive24
Published:

अहिल्यानगर – बालिकाश्रम रस्त्यावरील व बोल्हेगाव येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाने ही कारवाई केली. यात जागेतील पत्र्याचे शेड काढण्यात आले.

महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाईसाठी प्रशासन सज्ज असून, येत्या काळात महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. तसेच, बालिकाश्रम रस्त्यावर दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

बालिकाश्रम रस्त्यावर महानगरपालिकेच्या मालकीचा मोकळा भूखंड आहे. त्यावर काहींनी पत्र्याचे शेड उभारून दहा ते बारा टपऱ्या टाकल्या होत्या. या सर्व टपऱ्या, शेड गेल्या तीन दिवसांपासून कारवाई करून हटवण्यात आले. सुमारे अडीच एकर क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे.

त्याभोवती पत्र्याची संरक्षक भिंत करण्यात येणार आहे. तसेच, बोल्हेगाव येथेही महानगरपालिकेच्या एका मोकळ्या भूखंडावर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत वेळोवेळी तक्रारी झाल्या होत्या. हे अतिक्रमणही महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई करून हटवले आहे.

सध्या पत्रकार चौक ते दिल्लीगेट वेस रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बालिकाश्रम रस्त्यावर रहदारी वाढली आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. पत्र्याचे शेड, दुकानांचे जाहिरात फलक, फुटपाथवर साहित्य ठेवण्यात येते.

या भागाची संपूर्ण पाहणी करण्यात आली आहे. तेथील अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येत आहे. लवकरच सर्व अतिक्रमणे हटवून बालिकाश्रम रस्त्याचा श्वास मोकळा केला जाईल, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe