विधानसभेपूर्वीच गावचे कारभारी ठरणार :’त्या’ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; आता प्रतीक्षा निवडणुक अधिसूचनेची

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : जिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तर वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता या कार्यकाळ पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींसह रिक्त ग्रामपंचायत सदस्यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवारी (दि. १९) प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते.

जिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यामध्ये नेवासा तालुक्यातील २६, कर्जत १७, अकोले ८. नगर ७, संगमनेर २, कोपगाव ३, राहाता १, श्रीरामपूर २, राहुरी ३, शेवगाव ५, पाथर्डी ४, जास्वमेड ४, श्रीगोंदा १ आणि पारनेर १ आदींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा जानेवारीपासून रिक्त आहेत. यामध्ये काही निधन, तर काही राजीनामा दिलेल्या सदस्यांचा समावेश आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक ६९ सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर शेवगाव १९, संगमनेर १४ आणि नेवासा तालुक्यातील १० सदस्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात मागील पाच महिने आचारसंहिता लागू होती.

दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, चुकीची प्रभाग रचना झालेल्या, तसेच बहिष्कार व अन्य कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या राज्यातील सुमारे १ हजार ५८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तसेच सदस्य अथवा थेट सरपंच यांच्या रिक्त असणाऱ्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यासाठी लोकसभा निवडणुकीत वापरलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. यानुसार अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायती आणि १५० जागांवर पोटनिवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. १५ जुलैपर्यंत हरकती घेण्यास मुदत देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने राज्य निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करू शकते.

१६ मार्च ते ६ जुलैपर्यंत लोकसभा आणि त्यानंतर शिक्षक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठीदेखील विधानसभा मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला होता.

त्यामुळे रिक्त ग्रामपंचायतीसाठी विधानसभा निवडणुकीनंतरच अधिसूचना जारी होण्याचा अंदाज होता. मात्र, त्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी निश्चित केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका होण्याची शक्यता आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe