Ahilyanagar News:- गेल्या कित्येक दिवसापासून रखडलेल्या अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाच्या कामाला आता वेग येईल आणि काही दिवसांनी त्याचे काम सुरु होण्याची शक्यता असून गेल्या कित्येक दिवसापासून अतिशय बिकट अवस्थेत असलेला हा महामार्ग अनेक लोकांच्या मृत्यूला देखील कारणीभूत ठरलेला आहे.
परंतु आता लवकरात लवकर या महामार्गाचे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे व त्यामागील प्रमुख कारण म्हणजे नुकतेच शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला होता व या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की,
नगर ते मनमाड या महामार्गाची दखल आपण घेतली असून त्याकरिता येणाऱ्या आठ दिवसांमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढून या महामार्गाच्या कामासाठी 2500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाईल. त्यामुळे आता यामहामार्गाच्या कामाच्या बाबतीत घडामोडींना काही दिवसात वेग येऊन या महामार्गाचे काम सुरू होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
या अगोदर दोनदा काढल्या होत्या या महामार्गाच्या कामाच्या निविदा
नगर ते मनमाड महामार्गाच्या कामाच्या बाबतीत दोन वेळा निविदा काढल्या होत्या. तेव्हा हे काम बीओटी तत्त्वावर सुरू होणार होते. परंतु निविदा या कमी दराने भरल्या गेल्या.
तसेच मध्यंतरीच्या कालावधीमध्ये दोन ठेकेदारांनी अर्धवट काम सोडले. इतकेच नाही तर एका बँकेने खोटी बँक हमी दिल्यामुळे अनेक अपघात होऊन निष्पापांचे बळी यामध्ये गेले. त्यावेळी त्या दोन्ही ठेकेदारांवर कारवाई सुरू केल्या. परंतु आता येणाऱ्या पुढील पंधरा दिवसांमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या.
या सगळ्या पार्श्वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना तारांकित प्रश्न विचारला व त्यावेळी नितीन गडकरी यांनी उत्तर देताना वरील माहिती दिली.
काय म्हणाले नितीन गडकरी?
या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी म्हटले की, या मार्गावर शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांची ये जा मोठ्या प्रमाणावर असते व तो रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला त्यांचा मोठा संकोच वाटत असून त्याकरिता आम्ही आता एक अल्पकालावधी निविदा जारी केली व त्यासाठी 2500 कोटींची निविदा बोलावली.
त्यातून आता सदर काम निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दोन महिन्यात सुरू होईल असा विश्वास खासदार वाकचौरे यांना त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. या अगोदर या रस्त्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले.
मध्यंतरीच्या कालावधीत तीन ठेकेदार पळून गेले व आता दोन ठेकेदारांनी निविदा भरल्या. परंतु त्यामध्ये देखील पुन्हा तीच परिस्थिती उद्भवली. तोपर्यंत आता रस्त्याची डागडुजी करण्याचे आदेश दिले व त्यानंतर सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करून त्याचे काम पूर्ण केले जाईल असे देखील त्यांनी सांगितले.