महिलेशी गैरवर्तणूक करणार्‍या आस्थापना विभाग प्रमुखची हकालपट्टी करा सातपुते यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-मनपातील महिला कर्मचार्‍यांशी गैरवर्तणूक करणार्‍या आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांची आस्थापना प्रमुख पदावरून हकालपट्टी करून मनपा बिल्डींग आवारातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले की, महापालिकेतील आस्थापना विभाग प्रमुख मेहेर व लहारे यांच्याविरुद्ध अनेकदा कर्मचार्‍यांना त्रास देणे, महिलांची छेडछाड करणे विनाकारण त्रास देणे, शरीर सुखाची मागणी करणे याबाबत अनेकदा महिलांनी आणि कर्मचार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार केली.

तसेच स्वर्गीय शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी देखील याबाबत तक्रार केली होती. परंतु वरिष्ठ जाणीवपूर्वक या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने काही महिलांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली. त्यातून लहारे यांच्यावर महिला समिती मार्फत चौकशी करण्यात आली.

ती चौकशी देखील संशयास्पद आहे. लहारे हा आस्थापना विभाग प्रमुख असल्याने आणि त्याला उपआयुक्तांचे पाठबळ असल्याने, महिला पुढे येण्यास घाबरत होत्या व आहे. पण तरी देखील अनेक महिलांनी त्यात जवाब दिले असून तसा अहवाल समितीने आयुक्त यांच्याकडे देण्यात आला असून, अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही.

महिलांशी गैरवर्तणूक करणार्‍या लहारे यांची अस्थपणा प्रमुख पदावरून हकालपट्टी करावी व मनपा आवारातून इतरत्र बदली करावी व महिला समितीने दिलेल्या अहवालची तपासणी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.