अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-शहरातील करदात्यांना शास्तीत ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी नोव्हेंबरअखेर मुदत आहे.
ही मुदत डिसेंबर अखेरपर्यंत वाढवावी, अशी मागणी नगरसेवक शीला चव्हाण व माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली. करदात्यांनी सुमारे १९० कोटींचा कर थकवला आहे. कोरोनाच्या संकटात नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे कर भरण्याकडे त्यांनी पाठ फिरवली.
या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी थकबाकीवरील दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्याची घोषणा केली. संपूर्ण थकबाकीसह चालू कराचा भरणा करतील, त्यांनाच ही सवलत आहे. सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोव्हेंबरअखेर मुदत आहे. आतापर्यंत २७ कोटींचा कर वसूल झाला आहे. अजूनही थकबाकीचा डोंगर मोठा असल्याने सवलतीसाठी मुदतवाढ अपेक्षित आहे.
सणासुदीत नागरिकांना सवलतीचा लाभ घेता आला नाही. आर्थिक चणचण भासत असल्याने शास्तीमाफीच्या सवलतीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी. या मुदतवाढीमुळे मनपात सुमारे शंभर कोटीचा कर वसूल होऊ शकतो, असेही चव्हाण यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved