Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकरी दिवसेंदिवस ऊस उत्पादनापासून दूर चालल्याचे चित्र अधोरेखीत झाले आहे.
सोनई जवळील वंजारवाडी येथील रमेश डोळे या पदवीधर तरुण शेतकऱ्याने 25 गुंठे शेतात पिवळं सोनं अर्थात झेंडू फूल उत्पादनातून साडेतीन लाख रुपये कमविले आहेत. गेल्या वर्षी टोमॅटोच्या शेतीने नुकसान झाले, तरी त्यातून खचुन न जाता डोळे यांनी फुल शेती करण्याचा निर्णय घेतला.
वंजारवाडी येथील पोलीस पाटील रमेश डोळे हे असून हे एम. ए. पर्यंत उच्चशिक्षित असून नोकरीच्या मागे न लागता मेहनत आणि कष्टाच्या जोरावर अवघ्या 25 गुंठे शेतात झेंडूच्या फुलांची लागवड करुन त्यातून साडेतीन लाख रुपये कमविल्याचा विक्रम केला आहे.
रोज सकाळी आपल्या दुचाकीवरून अहमदनगर येथील फुलांचे व्यापारी वैभव आगरकर यांना विक्री करतात. डोळे यांनी पहिल्यांदाच झेंडूच्या फुलांची लागवड करताना दोन ओळी मध्ये सहा फुटांचे अंतर ठेऊन व झाडांची लागवड करताना दोन झाडाच्या मध्ये सव्वा फुटांचे अंतर ठेऊन झिंक – झाक पद्धतीने सहा हजार रोपांची लागवड केली.
त्यातुन आठ दिवसाकाठी सरासरी दहा क्विंटल फुलांचे उत्पादन मिळते. दोन महिला भगिनी सह बंधूंच्या मदतीने हे साध्य केले. टोमॅटोच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातुन विचार करुन विचारपुर्वक फुलशेती करण्याचा निर्णय घेतला.
एक उच्च शिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता शेतीच्या माध्यमातून आज लखपती बनला आहे. नेवासा तालुक्यात सफरचंद, केळी, सीताफळ आदी पिकाकडे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात वळू लागला आहे.