Ahmednagar News : सीना धरणातून उजव्या कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज (दि. १०) कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
गेल्या अनेक दिवसांपासून सीना लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पिण्यासहच् शेतीसाठी पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवत आहे. सिना उजव्या कालव्यावर तालुक्यातील २१ गावे अवलंबून असल्याने या गावांसाठी आवर्तन सोडणे गरजेचे आहे.
याच संदर्भात (दि. २९) जानेवारी रोजी आमदार रोहित पवार यांनी कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२ श्रीगोंदा, यांना आवर्तन सोडण्याची विनंती केली होती; परंतू त्यावर कार्यवाही झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ सरकारने आणल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखवली.
तरीही अद्यापी पाणी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांनी बराच वेळ रस्ता अडवून धरला होता. या वेळी आंदोलकांनी कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२ यांच्याशी फोनवर चर्चा करून उपस्थित अधिकारी यांना पत्र दिले.
सोमवारी (दि. १२) बैठक घेऊन आवर्तन सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, आंदोलकांनी आपली मागणी मान्य न झाल्यास (दि.१४) तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. सीना आवर्तन प्रश्नांवरही आवाज उठवला असताना फक्त राजकीय विरोध म्हणून पाणी सोडले जात नाही. या वेळी रघुआबा काळदाते, गुलाब तनपुरे, डॉ. कोरडे आदींची भाषणे झाली.