Ahmednagar News : गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागली. मान्सूनमध्ये कमी पाऊस झाला असल्याने याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातून अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. एवढेच नाही तर त्या चार महिन्यात झालेल्या कमी पावसामुळे आता काही ठिकाणी पाणीटंचाईची भीषण समस्या पाहायला मिळत आहे.
अजूनही उन्हाळ्याला सुरुवातही झालेली नाही आणि अशातच पाण्याची टंचाई देखील भासू लागली आहे. यामुळे दुष्काळाची दाहकता किती आहे हे स्पष्ट होत आहे. या अशा दुष्काळी परिस्थितीमुळे काही ठिकाणी जनावरांसाठी चाराही उपलब्ध होतं नसल्याचे चित्र आहे. यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आले असून आता आपल्याजवळील पशुधन कसे वाचवायचे, त्यांना चारा कुठून आणायचा हा मोठा सवाल शेतकऱ्यांपुढे आहे.
चारा टंचाईमुळे चाऱ्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. पशुखाद्याचे दर आता आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या अडचणीत आला असल्याचे चित्र आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळाची झळ म्हणून सध्या चारा टंचाई भासू लागली आहे.
दरम्यान या चारा टंचाईवर रामबाण उपाय म्हणून अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा दुसऱ्या जिल्ह्यात वाहतुकीसाठी मनाई केली आहे. यासाठी त्यांनी थेट मनाई आदेश काढला आहे. यानुसार आता अहमदनगर जिल्ह्यात उत्पादित होणारे मुरघास, आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन जाता येणार नाही.
म्हणजे याच्या वाहतुकीवर बंदी राहणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे जिल्ह्यात चाऱ्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधन संकटात सापडणार अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा जिल्ह्यातच राहावा यासाठी ही तजवीज केली आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू केले असून अहमदनगर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा दुसऱ्या जिल्ह्यात नेता येणार नाही, असे आदेश काढले आहेत. तसेच काढलेला हा आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार आहे. यामुळे जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निकाली निघेल अशी आशा व्यक्त होत आहे.
हे पण वाचा : तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी आहे व तुम्हाला पैशांची गरज आहे का? सोप्या पद्धतीने घेऊ शकता एलआयसी पॉलिसीवर कर्ज
तुम्हीही पीएफधारक आहात का? 23 फेब्रुवारी नंतर होतील ‘ही’ खाती बंद
एमआयडीसीसह साकळाईची घोषणा म्हणजे केवळ चुनावी मामला, विखे पितापुत्रांवर मोठा घणाघात